मुख्यमंत्र्यांचे वारंवार फोन पण निर्णय…मंत्रीपदाच्या दाव्यावर बच्चु कडू स्पष्टच बोलले!

बच्चू कडू यांची मोठी घोषणा

मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू हे गेले काही दिवस मंत्रिपदावरुन अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत होते. आज सकाळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण ११ वाजता याबाबत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावेळी आपण मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो मात्र गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार, आता त्यांचा निर्णय झाला असून १७ जुलै रोजी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी ते निर्णय जाहीर करणार आहेत.

बच्चू कडू यांना मंत्रिपदाची आशा होती. मात्र राज्यात झालेल्या अनेक राजकीय उलथापालथीमुळे मंत्रिपदाच्या आशा मावळू लागल्या आहेत. त्यातच मंत्रिपदावर आपण दावा करणार नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्येच राहू पण मंत्रिपदाच्या शर्यतीत आपण नसू असं बच्चू कडू म्हणाले. १७ जुलै रोजी आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं ते म्हणाले.

शिंदेसाहेबांचा आयुष्यभर ऋणी

आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे देशातील पहिल्या दिव्यांग मंत्रालय तयार झालं. यासाठी मी शिंदेसाहेबांचा आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी व व्यक्तिगत पदासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन. दिव्यांग मंत्रालयासाठी ४ जीआर (GR) काढल्याबद्दल मी देवेंद्रजींचेही आभार मानतो.

सगळंच काही पदासाठी नसतं

पण एकंदर सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता हे जे काही बदलतं राजकारण आहे, यालाही आमचा कंटाळा आलेला आहे. लोकांच्या याकडे पाहण्याच्या भूमिका अतिशय विचित्र पद्धतीने जात आहेत. काही लोक चारित्र्यहनन करण्यासाठी कधीकधी पैसे देऊनही कमेंट्स करतात. याला कुठेतरी स्थिरता यावी आणि सगळंच काही पदासाठी नसतं हे लोकांना समजावं.

आपण सामान्यांसाठी आहोत

आमची भूमिका ठाम आहे आणि यानांतर आम्ही जे काही करणार आहोत ते दिव्यांगांसाठी, शहिद परिवारासाठी, घरेलु कामगार, शेतमजूर, शेतकरी यांच्यासाठी करु. त्यामुळं मंत्रीपदाचा दावा आम्ही सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे.

आपण सामान्यांसाठी आहोत, सामान्यांसाठी राहायला पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असतील. पण त्या दुरुस्त करण्याची काळजी आम्ही करायला पाहिजे. मला दिव्यांगांसाठी, मतदारसंघासाठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मंत्रीपद घेतलं तर तो वेळ देता येणार नाही. मी आज निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की आज कुठला निर्णय घेऊ नका. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. १८ तारखेला मी त्यासंदर्भात निर्णय जाहीर करेन, असं ते म्हणाले.

कुणीतरी माघार घेतली पाहिजे

त्यांना अडचण होऊ नये की कुणाकुणाला मंत्रीपद देणार? त्यांच्याही मागे पेच आहे. कुणीतरी माघार घेतली पाहिजे ना? त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवांचा विचार केला. आज मुख्यमंत्री या पेचात असताना सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना काय मदत करता येईल, यातून त्यांना अधिक निर्णय घेणं कसं सोपं जाईल यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

मंत्रिपदाच्या शर्यतीतून बच्चू कडू यांची माघार

गतवर्षीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी होती. जेव्हा सद्यकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात त्यांनी साथ दिली तेव्हा नव्या सरकारमध्येही मंत्रिपदाची इच्छा त्यांच्याकडून वेळोवेळी व्यक्त केली जात होती. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आपल्याला मंत्रीपद मिळणार, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता या दाव्यातून त्यांनी माघार घेतली आहे.

बच्चू कडूंना रात्रभर नव्हती झोप; गुणगुणत होते ‘हे’ गाणं

बच्चू कडू यांना मंत्रिपदाची आशा होती. जेव्हा सद्यकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात त्यांनी साथ दिली तेव्हा नव्या सरकारमध्येही मंत्रिपदाची इच्छा त्यांच्याकडून वेळोवेळी व्यक्त केली जात होती. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आपल्याला मंत्रीपद मिळणार, असा दावा त्यांनी केला होता. तर अगदी सकाळपर्यंत आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू यांनी मंत्रीपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली, यावर पत्रकाराने त्यांना प्रश्न केला असता कडू म्हणाले की, मी रात्रभर ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना’ हे गाणं ऐकत होतो. मनाचा विश्वास जेव्हा जातो, आणि ज्या गोष्टीने विश्वास जात असेल अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे असं कडू यावेळी म्हणाले.