शासनामध्ये राहून ओबीसीचे प्रश्न सोडवणार, आम्ही महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक-छगन भुजबळ

मंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेत छगन भुजबळांनी नरेंद्र मोदींचं केलं तोंडभरुन कौतुक

मुंबई : आज राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राजभवनमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून ते पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळांनीदेखील आपली प्रतिक्रिया मांडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

छगन भुजबळ म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीकाही केली मात्र हे नाकारता येत नाही की मजबूत अशा देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात सुखरुप आहे. महाराष्ट्र असो किंवा भारत असो विकासाच्या कामांसाठी ताबडतोब निर्णय घेऊन तसेच अनेक प्रश्नांवर निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ओबीसीचे प्रश्न सोडवायचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सहकार्य असल्याशिवाय ते सुटणारच नाहीत. परंतु आमच्या निर्णयामुळे ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवता येणार आहेत, असं म्हणत छगन भुजबळांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं.

२०२४ मध्ये देखील मोदीजीच निवडून येणार

देशामध्ये जे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, पाटण्याला जी मिटींग झाली त्यात आपण पाहिलं की हा सोडून जातोय, तो सोडून जातोय, अर्धे येतात, अर्धे येत नाहीत. खरं सांगायचं तर अजित पवारांनी आम्हाला सांगितलं की २०२४ मध्ये देखील मोदीजीच निवडून येणार आहेत. आता जर हे असं आहे तर आपणदेखील एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्यासोबत गेलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच प्रश्नांवर भांडून प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे शासनामध्ये राहून शासनाला मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं छगन भुजबळ म्हणाले.

आम्ही महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक

काही लोकांचा गैरसमज आहे की आम्ही पार्टी सोडली मात्र तसं नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक बनून सामील झालो आहोत. आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की राज्याच्या समस्या, शेतकर्‍यांचे, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर सकारात्मक काम करणं गरजेचं आहे.

उगीच आमच्यावर बालट लावू नका

लोक म्हणतात की अजित पवार यांच्यावर केसेस आहेत म्हणून ते गेले. पण महत्त्वाची केस सुटलेली आहे. शिवाय अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आश्रम, दिलीप वळसेपाटील, संजय बनसोडे यांच्यावर केस नाही. हसन मुश्रिफ यांच्यावर केस असली तरी त्यांच्याविरुद्ध काहीच ठोस पुरावे नसल्याने कोर्ट सतत तारखा पुढे ढकलत आहे. त्यामुळे उगीच कोणी आमच्यावर बालट लावण्याचा प्रयत्न करु नये. तुम्ही तुमचं कामू करा आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवू, असं छगन भुजबळ म्हणाले.