मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’! 

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम सारथी संस्थेमार्फत केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वप्नांना बळ मिळत आहे…

‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या ‘सारथी’चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने, सुलभरित्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई (खारघर नवी मुंबई) व लातूर अशी एकूण आठ विभागीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली या संस्थेचे कामकाज चालते. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या तसेच इतर समकक्ष स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने ‘सारथी’मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदत केली जाते. ‘सारथी’ संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करणे सहज शक्य झाले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन

‘सारथी’ संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’मार्फत देण्यात येते. त्यामुळे त्याचा बोजा पालकांवर पडत नाही. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत केली जाते. नवी दिल्ली व पुणे येथे पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन म्हणून दिली जाते. मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक मदत देण्यात येते. ‘सारथी’कडून झूम मिटींग व अभिरूप मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी अधिकची तयारी करून घेतली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा 2022 च्या निकालामध्ये 17 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा राजपत्रित, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, वन सेवा इत्यादी परीक्षांविषयी ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’मार्फत देण्यात येते. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाते. पूर्व परीक्षेचे प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन देण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य देण्यात येते. परिणामी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा – 2022 परीक्षेत 103 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत अधिकारीपदी निवड झाली. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कृषि सेवा परीक्षेत ‘सारथी’मार्फत सहाय्य देण्यात आलेल्या 67 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत अधिकारीपदी निवड झाली आहे.
यासोबतच ‘सारथी’मार्फत बँकिंग पूर्व परीक्षा, कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन) स्पर्धा परीक्षांविषयक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट, सेट परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येत आहे.

एम.फील. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये एम.फिल. किंवा पीएच.डी. करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत अधिछात्रवृत्ती दिली जाते. यामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दरमहा 31 हजार रुपये असून सिनीअर रिसर्च फेलोशिप दरमहा 35 हजार रुपये आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एचआरए, आकस्मिक निधी देण्यात येतो. या अधिछात्रवृत्ती योजनेचा 2 हजार 109 विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून दरवर्षी संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.

‘सारथी’ कौशल्य विकास कार्यक्रम

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण (CSMS-DEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व तालुकास्तरावर 20 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच इंडो जर्मन टुल रूम (IGTR), औरंगाबाद अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रममार्फत 950 विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे प्रशिक्षण सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 2 हजार 400 केंद्रांतर्गत सर्व कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मर्सिडीज-बेंझ व यामाहा या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील पालकाचे आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 9 हजार 600 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. आज अखेर या योजनेतून 32 हजार 539 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली आहे.

‘सारथी’चे इतर महत्त्वपूर्ण उपक्रम

‘सारथी’मार्फत अग्नीवीर भरती पूर्व अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते. तसेच परदेशी भाषा अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरु करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनाही सुरु करण्यात आली आहे. नाशिक येथे 200 मुलींसाठी मातोश्री मुलींचे वसतिगृह सुरु करण्यात आले आहे.

कृषिविषयक प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील आयएफएटी, डब्ल्यूबीएटी शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (एनआयपीएचटी) संस्थेमध्ये शेतकऱ्यांसाठी नऊ प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.पुणे येथील महाराष्ट्र सेंटर फोर डेव्हलपमेंट (एमसीडीसी) मार्फत शेतकरी उत्पादन संस्था, कंपनी यांचे संचालक व सीएफओ यांचा क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम ‘सारथी’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

‘सारथी’ संस्थेच्या कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर व नवी मुंबई (खारघर) येथील विभागीय कार्यालये, मुला-मुलींचे वसतिगृह, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-अभ्यासिका इत्यादीसाठी राज्य शासनाने ‘सारथी’ संस्थेस मोफत जागा उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी इमारत उभारणीचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहेत. तसेच सारथी संस्थेच्या पुणे येथील मुख्यालय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.

‘सारथी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

“सारथी” च्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी समाजाच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील लोकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व ‘सारथी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

– तानाजी घोलप,

माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर