देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

कोल्हापूर:- ‘वसुदैव कुटुंबकम’ या तत्वावर वाटचाल करणारा आपला भारत देश अनेक देशांना सहकार्य करत विकास साधत असून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.

विवेक विचार मंच, सहयोगी संस्था व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र.कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विवेक विचार मंचचे अध्यक्ष प्रदीप रावत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक न्यायासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री.दौलतराव खरात, बुलढाणा, विदर्भ, श्री. वाल्मिक निकाळजे, बीड, मराठवाडा, श्री. योगेश शिंदे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, प्रा. डॉ. अमर कांबळे, इचलकरंजी, कोल्हापूर या मान्यवरांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार 2023 देऊन गौरविण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार दर्शन या डॉ.अंबादास सकट यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने चित्रफीत दाखवण्यात आली.

 केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत देश अनेक देशांना सहकार्य करत आहे. कोरोना परिस्थितीत औषधे व लसींचा पुरवठा तसेच अन्य संकटकालीन परिस्थितीतही देशाने मदतीचा हात पुढे केला आहे. देशात कौशल्याधिष्ठित युवा पिढी तयार होत असून त्यांना जगभरातून संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या संविधानाचा सन्मान करणे, प्रत्येकाचे कर्तव्य असून देशाचा विकास साधताना स्त्री शक्तीचा सन्मान होणेही तितकेच महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्यायाच्या विचारांनी वाटचाल करा – कामगार मंत्री सुरेश खाडे

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, समाजाच्या उन्नतीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कार्यामुळेच आपण घडलो आहोत. महापुरुषांनी दिलेला सामाजिक न्यायाचा विचार आणि त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करायला हवी. मनात जिद्द बाळगून काम केल्यास निश्चितच चांगले फळ मिळते, असे सांगून ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र वाचून त्यांचे कार्य जाणून घ्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन घडवा. सामाजिक न्यायाचा विचार जोपासा. सक्षम व्हा. लढण्याची ताकद अंगी बाळगून अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी एकत्र या. आत्मनिर्भर व्हा. प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ठेवा. स्वतः मोठे व्हा आणि इतरांनाही मोठं करण्याची वृत्ती अंगी बाळगा, असा संदेश देऊन देशात सामाजिक समता निर्माण करण्यामध्ये विवेक विचार मंचचे काम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश दिला. या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा संदेश देत समाजाला योग्य दिशा व सामाजिक भान दिले. सामाजिक समतेचा संदेश व त्यासाठी कार्य करुन लोकशाहीची मुहूर्तमेढ छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात रोवली. याच विचारांनी लोकशाही मार्गाने वाटचाल करत भारत देशाने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे, असे संदेशात सांगून विवेक विचार मंचचे कार्य महत्वपूर्ण असून समृद्ध समाज घडवण्यात ही राज्य परिषद महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून बार्टीचे महासंचालक सुनील वारे म्हणाले,  अनुसूचित जाती जमातीतील प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन हाताला काम मिळवून देण्याचे काम बार्टीच्या माध्यमातून करण्यात येत असून याचा लाभ घ्यायला हवा.

कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, जाती धर्मांतील भेद नष्ट करुन समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचे विचार जोपासणे गरजेचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक उपक्रम राबवून सामाजिक समतेचा संदेश कृतीतून दिला.

डॉ.पी.एस.पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शाहू महाराजांचे जीवनचरित्र दोन परकीय भाषांबरोबरच विविध राज्यांच्या भाषेमध्येही भाषांतर करुन शाहू महाराजांचे कार्य केवळ राज्यापुरतते मर्यादित न राहता देश विदेशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबरोबरच महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही त्यांच्या कार्याच्या माहितीचा समावेश करण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांचे विचार दीपस्तंभासारखे असून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक उपक्रम विद्यापीठात राबविण्यात येत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाचा विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी या राज्य परिषदेचा हेतू विशद करुन मंचाच्या कार्याची ओळख करुन दिली. आभार कुलसचिव डॉ.व्ही. एन. शिंदे यांनी मानले.