ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही -गृह विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना – भाजप सरकारने बुधवारी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. सरकारने उद्धव, आदित्य व तेजस यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही कमी केल्यात. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजप सरकारच्या निर्णयानुसार, यापुढे उद्धव ठाकरे यांना झेड ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा मिळेल. सरकारने मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत कपात केली आहे. तसेच ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी व पायल व्हॅनही कमी केली आहे.राज्याचे गृह खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.