मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विशेष रेल्वे सेवेचा केला शुभारंभ

मनमाड ,११ एप्रिल  /प्रतिनिधी :-रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज महाराष्ट्रातील मनमाड रेल्वे स्थानकापासून सुरू होणाऱ्या मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे राज्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

Image

यावेळी संबोधित करताना रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की ‘कोविड -19 महामारीच्या कालखंडात जेव्हा सर्व काही बंद होते तेव्हा जनतेसाठी पुरवठा साखळी सुरळीत सुरु रहावी म्हणून रेल्वेने आपली मालवाहतूक आणि पार्सल सेवा सुरळीत सुरू ठेवली.’

2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ब्रॉड गेज रेल्वेमार्गावर 100% विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे असे दानवे यांनी यावेळी सांगितले. स्थानकांचा विकास, समर्पित  मालवाहतूक मार्गिका, दुपदरीकरण इत्यादी बाबींवर देखील रेल्वे काम करत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी, व्यापारी,  विद्यार्थी आणि इतर दैनंदिन प्रवाशांसाठी ही रेल्वेसेवा सुरू  करण्याच्या आपल्या विनंतीला मान दिल्याबद्दल आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी  रेल्वेचे आभार मानले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी मनमाड -मुंबई विशेष रेल्वे सेवेबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि ही रेल्वे सेवा प्रवाशांना कशा तऱ्हेने फायदेशीर ठरेल याबद्दल मार्गदर्शन केले.

मुख्य अतिथी म्हणून आमदार सुहास कांदे, तसेच मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, अतिरिक्त महाव्यवस्थापक व मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख बी. के. दादाभॉय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात यावेळी उपस्थित होते. मनमाड स्थानकावर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस केडिया हे उपस्थित होते.