राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे  

गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई ,२१ जून /प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून 3 ते 15 जुलैदरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव श्री. ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री  श्री. लोढा म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खूपच आवश्यक आहे.  शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापीठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी  नियोजन करण्यात आलेले आहे.

युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी  तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत

पहिला दिवस

महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर भारतीय स्त्री शक्ती संस्था   मार्गदर्शन करेल. सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील.

तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात 1 हजार युवती सहभागी होतील

दुसरा दिवस

स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक

स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी 9.00 ते 9.45   या वेळेत होणार असून  1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

तिसरा दिवस          

प्रात्यक्षिक आणि सराव सकाळी 9.00 ते 9.45 या वेळेत प्रशिक्षण होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

प्रात्यक्षिक आणि सराव   सकाळी 10.05 ते 10.50 या वेळेत होणार असून 1 हजार युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी 20 प्रशिक्षक असतील.

या तीन दिवसाच्या शिबीरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल.

मुंबई विद्यापीठएसएनडीटी, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर आज मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांचेसोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ४० लाख बालक,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.