देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ‘फटकारले’ ;विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे सडेतोड उत्तर

सावरकरांचं नाव पुसायला निघालेल्या आणि धर्मांतरणाला समर्थन देणा-या कर्नाटक सरकारबद्दल ‘उद्धवजी’ तुमचं मत काय?

धाराशिव , १६​ जून / प्रतिनिधी :-कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्याने राज्यात ठाकरे गट प्रचंड खूश झाला होता. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार असं वक्तव्य करत होते. मात्र कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांवर भाजपाकडून (BJP) सडकून टीका होत आहे. यासंदर्भात मत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ‘आता उद्धव ठाकरे यांची यावर प्रतिक्रिया काय आहे?’ असं म्हणत ठाकरेंना थेट टार्गेट केलं आहे.

सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कर्नाटक सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. कर्नाटकात मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदादेखील रद्द केला गेला आहे. या निर्णयांना भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.

सत्तेसाठी केली तडजोड : देवेंद्र फडणवीस

एखादा धडा तुम्ही अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

पुढे ते म्हणाले, माझा मविआला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही तडजोड केली हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

आधीचे सरकार घरी होते, आमचे सरकार लोकांच्या दारी जातेय-विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचे सडेतोड उत्तर

पुणे : आधीचे सरकार घरी होते, आमचे सरकार लोकांच्या दारी जातेय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमांवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत.

राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत. त्यामुळे नागरिकांचादेखील या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आहे. या कार्यक्रमात वाटत असलेले साहित्य आणि दाखले आपण बघतो आहोत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी वायफळ खर्च होत नाही आहे. उलट नागरिकांना याचा फायदाच होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही आहे. आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे. आमची युती आजची नाही तर फार जुनी आहे. या युतीत जो खडा ठरला होता. त्या खड्याला आम्ही बाहेर काढलं आहे. त्यामुळे माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या जाहिरातीमुळे कोणताही वितुष्ट निर्माण झाला नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमची युती कधीच तुटणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अराजकतेचे उदाहरण म्हणजे काँग्रेस : चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसला मत देणे म्हणजे या देशात किती अराजकता होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. उद्धव ठाकरेंनी यावर आता आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. आता उध्दव ठाकरे यांनी लंडनमधून किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मान्य आहे का? आणि या नंतरही शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे असे ते म्हणाले.