‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नरत

नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यम संस्थांचे पत्रकार, छायाचित्रकार विशेषत: खाजगी वाहिन्यांच्या माध्यमकर्मींच्या सुरक्षेबद्दलची गंभीर दखल घेत, त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नरत राहील, असा विश्‍वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.

चक्रीवादळाच्या वार्तांकनासाठी सर्व वाहिन्यांद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांबाबत आज मार्गदर्शक सूचना मंत्रालयाने जारी केल्या असून, घटनास्थळावर चक्रीवादळाबाबत वार्तांकन करणाऱ्या विविध वाहिन्यांचे पत्रकार, छायाचित्रकार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

ज्या भागात या वादळाचा जास्त परिणाम होऊ शकतो अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी, अशा स्पष्ट सूचना मंत्रालयाने माध्यम संस्थांना केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत संस्थांनी संबंधित भागातील वार्तांकन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करून घेऊ नये, तसेच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या खबरदारीच्या उपायासंबंधीच्या सूचनांचे पालन करुनच माध्यमकर्मी तैनात करावेत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकेल. यामुळे विविध प्रकारचे नुकसान संभवू शकते. राज्य सरकारांसह केंद्र सरकार, या वादळाचा परिणाम सौम्य करण्याच्या दृष्टीने संपूर्णपणे प्रयत्न करत आहे, असे मंत्रालयाने कळविले आहे.