निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा

मुंबई:
कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. या  चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळ वेगाने ताशी 55 किमी वेगाने मुंबईच्या दिशेन सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वादळामुळे रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाही. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे. 

वादळाने रायगडच्या किनारपट्टी भागासह सात तालुक्यांना मोठा तडाखा दिला. यामध्ये झाडे कोसळणे, घरावरील छपरे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने यात अलिबाग तालुक्यात विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला.या वादळाचा फटका किनारपट्टीवरील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांबरोबरच महाड, माणगाव, पोलादपूर, पेण या तालुक्यांनाही बसला आहे. साडेतीन तासांनंतर हे वादळ शांत झालं. त्यानंतर रस्ते मोकळे करण्याचे तसेच विजवाहक तारांच्या जोडणीचं काम हाती घेण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच किनारपट्टी भागातील नारळ  आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भरकटलेलं जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रातील अजस्त्र लाटांमध्ये अडकले आहे. जहालाजा मिरकरवाडा बंदरात नेण्यात अपयश आले आहे. जहाजावर काही खलासी असण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. 


 मुंबईतही वाऱ्याचा वेग होता. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे समुद्र सेतूवरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालक माघारी फिरत असून पुढील सूचना येईपर्यंत सी-लिंक बंद असल्याची माहिती पोलिस अधिकऱ्यांनी दिली.


निसर्ग वादळामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर लावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटी सुटण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा बोटी बांधाव्या लागत आहेत. तसेच कच्च्या घरातील लोकांना पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय साधून इतरत्र स्थलांतरित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *