मान्सून लांबणीवर! केरळात दाखल व्हायला अजून दोन ते तीन दिवसांचा अवधी, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई, ५ जून / प्रतिनिधी :- मान्सून चार जून रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, मान्सून केरळात दाखल व्हायला अजून दोन ते तीन दिवसांचा अवधी लागणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अजून काही दिवस पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सर्वसाधारण पणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळात दाखल होत असतो. भारतीय हवामान खात्याने चार जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनला किनारपट्टीवर अनुकूल वातावर तयार होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्यासाठी वेळ लागणार आहे. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबल्यास त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात देखील मान्सून लांबण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.