वैजापूर शहर व परिसरात मृगाची हजेरी ; तासभर जोरदार पाऊस, शेतकरी सुखावला

वैजापूर ,९ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व परिसरात आज सायंकाळी 5.55 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. मृग नक्षत्राचे आगमन झाल्यामुळे  पावसामुळे शेतकरी सुखावला असून खरीप पेरण्यांना वेग येणार आहे.

मृग नक्षत्राला मंगळवारपासून प्रारंभ झाला. शेतकऱ्यांना केवळ मृगाच्या पावसाची प्रतिक्षा होती. मशागतीची तयारी पूर्ण करून खरीप पेरण्यासाठी शेतकरी सज्ज झालेला असतांना शहर व परिसरात आज सायंकाळी अचानक मेघागर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली.त्यामुळे शहरातील अनेक भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरातील शास्त्रीनगर भागात निलगिरीचे झाड विजेच्या तारेवर पडल्याने विजेचा खांब वाकून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.खरीप हंगामाची शेतकऱ्यांनी जोरदार तयारी केली असून मृगाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून बी-बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना 1 जूनपासून किरकोळ विक्रेत्यांकडून कापूस बियाणे लागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शंभर टक्के पेरणी झाली होती. यंदा पाऊस भरपूर असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.त्यामुळे शेतकरी जोमाने कामाला लागला आहे.