मोदी सरकारमुळे विकसित, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे प्रतिपादन

मुंबई, ५ जून  / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले आहे . हे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत अनेक निर्णय घेतले असून या प्रयत्नांना जनतेची साथ मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीने देशभर महाजनसंपर्क अभियान आयोजित केल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी सोमवारी दिली. मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. रवी बोलत होते. अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर , सह संयोजक कृपाशंकर सिंग , आ. पराग अळवणी, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री . रवी यांनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीचा विस्ताराने आढावा घेतला . ते म्हणाले की , २०१४ पूर्वीची देशाची स्थिती आणि आताची स्थिती यात मोठा फरक आहे . २०१४ पूर्वी देशात ७४ विमानतळ होते . आता देशातील विमानतळांची संख्या १४९ झाली आहे. गेल्या ९ वर्षांत देशात ३९० नवी विद्यापीठे सुरु झाली, ७ आयआयटी, १५ आयुर्विज्ञान संस्था , ७ आयआयएम ( व्यवसाय व्यवस्थापन संस्था ) सुरु करून मोदी सरकारने कार्यक्षम सरकार कसे असते याचा आदर्श घालून दिला. मनमोहन सिंग सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चर्चा होत असे , तर गेल्या ९ वर्षांत मोदी सरकारच्या विकास योजनांची चर्चा होत आहे.

‘सब का साथ सबका विकास’ ही घोषणा प्रत्यक्षात आणून समाजाच्या विविध वर्गांच्या कल्याणासाठी योजना आखून त्या प्रत्यक्षातही आणल्या. सुरक्षा विमा , गरीब कल्याण अन्न योजना या सारख्या अनेक योजनांतून गोरगरीबांच्या कल्याणाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल  कॉरिडॉर, अयोध्या येथे राममंदिराची उभारणी यातून देशाचे सांस्कृतिक पुनरुत्थानही केले जात आहे , असेही श्री. रवी नमूद केले. ते म्हणाले की, देशात गेल्या ९ वर्षांत वेगवेगळया क्षेत्रात झालेले बदल सामान्य माणूस अनुभवतो आहे. मोदी सरकारमुळेच कोरोना संकटावर मात करून देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या भारताचा जीडीपी ७ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. ही माहिती महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवली जाणार आहे.