मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध* -पालकमंत्री अमित देशमुख

  • हुतात्मा स्मारक येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण
  • पालकमंत्र्यांकडून हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन सर्व जिल्हावासीयांना शुभेच्छा
  • पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना

लातूर,दि.17:- मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येत नसल्याने भारत सरकारने पोलीस कारवाई करून 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद  निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त केला व या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. या लढ्यात ज्या थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले त्या थोर हुतात्म्यांना अभिवादन करून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढा उभा करून मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व शहिदांना अभिवादन करून आपण सर्वजण आजच्या या शुभदिनी विकासासाठी एकत्रित आले पाहिजे. राज्य शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी महाराष्ट्र राज्य कोविड -19 मधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्याच्या प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोवीड मुक्त राज्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. लातूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ झालेला असून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा, पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

आज संपूर्ण मराठवाड्यात मुक्तिसंग्राम दिनाचा हा समारंभ उत्साहाने साजरा होत आहे. या समारंभास उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच ऑनलाइन प्रेक्षपणाद्वारे हा समारंभ साजरा करणारे स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता,विद्यार्थी-पालक पत्रकार बंधू-भगिनींना पालकमंत्री देशमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.प्रारंभी मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर पोलीस पथकाने मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच पोलीस बँड पथकाने यावेळी मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्याकडून समारंभास उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी व मान्यवरांच्या भेटी घेऊन सर्वांना मराठवाडा मुक्ति दिनाच्या शुभेच्छा दिल्या.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथका मधील आशा वर्कर्स यांना प्रतिनिधिक स्वरुपात सुरक्षा किट व नागरिकांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय किटचे वितरण पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते येथे करण्यात आले.

त्याप्रमाणेच लातूर महापालिकेचे अंतर्गत बेघर व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा धनादेशाचे वितरण झाले. तर कोरोना काळात चांगली सेवा बजावलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स इत्यादींना कोरोना योद्धा म्हणून श्री . देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शुभारंभ

राज्यात 15 सप्टेंबर 2020 पासून कोविड मुक्त महाराष्ट्र साठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आज टाऊन हॉल च्या प्रांगणात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महापालिका हद्दीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या समारंभास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित लाक प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. मुक्ती संग्राम दिनानिमित्त च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ञ उद्धव फड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *