अल्पवयीन कुस्तीपटूचा अनेकवेळा भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्षाकडून छळ

एफआयआरमध्ये केला गेला दावा; अयोध्येतील ५ जूनचा मेळावा लांबणीवर

ब्रिजभूषणला ९ जूनपर्यंत अटक करा महापंचायतीचा इशारा

नवी दिल्ली, २ जून/प्रतिनिधीः भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांनी अल्पवयीन कुस्तीपटूचा अनेकवेळा लैंगिक छळ केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. 

एफआयआरमध्ये लैंगिक छळाचा दिलेला तपशील असा-“सर, मैं अपने बल-बुतेपर यहाँ तक आयी हूं. आगे भी मेहनत करके आगे तक जाऊंगी.” असे १७ वर्षांच्या कुस्तीपटूने ब्रिज भूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. छायाचित्र घेण्याच्या निमित्ताने सिंह यांनी तिला घट्ट धरून ठेवले होते.

या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी (सिंह) “तिला स्वतःच्या दिशेने ओढले आणि तिच्या खांद्यावर जोराने दाबले. मुद्दाम त्याचा हात माझ्या खांद्यावरून खाली घेतला व त्याचे हात माझ्या छातीला घासले. असे करताना ते म्हणत होते की ‘तू मेरे को सपोर्ट कर, मै तेरे को सपोर्ट करूंगा, मेरे साथ टच मे रहना.”

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार ती घटना वर्ष २०२२ मध्ये घडली तेव्हा ती १६ वर्षांची होती. ती राष्ट्रीय खेळांत सब ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी सहभागी होती. सिंह यांना त्या अल्पवयीन मुलीने जोरदार विरोध केल्यावर त्यांनी तिला सांगितले की, एशियन अजिंक्यपद स्पर्धेसाठी चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत आणि तू मला सहकार्य करीत नसल्यामुळे आगामी ट्रायल्समध्ये तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

“आरोपीने माझ्या मुलीला त्याच्या खोलीतही बोलावले. आरोपीच्या सांगण्यावरून माझ्या मुलीचे करीअर बिघडणार असल्यामुळे माझी मुलगी दडपणाखाली होती त्यामुळे तिने त्याची त्याच्या खोलीत भेट घेतली. आरोपीने माझ्या मुलीला त्याच्याकडे ओढले आणि त्याने तिच्याशी शारीरिक संबंधांसाठी प्रयत्न केले. माझ्या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला व तिने ताबडतोब स्वतःची त्याच्या पकडीतून सुटका करून घेतली व खोलीच्या बाहेर आली,” असेही एफआयआरमध्ये म्हटले.

आपला मुद्दा सिद्ध करून दाखवण्यासाठी तक्रारीत असेही म्हटले की, मे २०२२ मध्ये एशियन चॅम्पियनशिपसाठी चाचणी  घेतल्या जात होत्या तेथे सिंह यांनी या अल्पवयीन कुस्तीपटूला भेदभावाची वागणूक दिली.


“चाचणीमध्ये जो कोणता खेळाडू त्या आधीच्या स्पर्धेत किंवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला असल्यास त्याला पसंती दिली जाण्याची नित्याची पद्धत आहे. तथापि, माझ्या मुलीला असे प्राधान्य वा पसंती देणे तर दूरच पण तिच्या वजन गटातील सगळे स्ट्राँग कंटेनडर्स/खेळाडू माझी मुलगी ज्या गटाची सदस्य होती त्याच गटात घेण्यात आले. ती ट्रायल ही जी रूढी होती तिच्या पूर्णपणे विरोधात होती. कारण नित्याच्या पद्धतीनुसार जे आश्वासक खेळाडू आहेत त्यांना वेगळ्या गटात ठेवले जाते म्हणजे त्यांना ट्रायलमध्ये चांगली संधी मिळवता येईल. पर्यायाने भारताचे प्रतिनिधित्व अत्यंत खात्रीचे खेळाडू करू शकतील,” असे त्यात म्हटले आहे. माझ्या मुलीने आरोपी करीत असलेल्या अशिष्ट लैंगिक वर्तनाला नकार दिल्यानंतर ट्रायल्समध्ये घेण्यात आलेल्या सामन्यांचे जे चित्रीकरण व्हायला हवे असते ते हेतूतः विस्कळीत करण्यात आले. वारंवार ते ऑन आणि ऑफ केले गेले, असा एफआयआरमधील आरोप आहे. “माझी मुलगी लखनौत ट्रायल्सचा सराव करीत असताना आरोपीने तिच्याशी संपर्क साधून तिला पर्सनली आकर मिलना, असे म्हटले. तिने त्याला स्पष्टपणे सांगितले की, मला कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यात गोडी नाही, असे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही माझा पाठलाग थांबवा.

ब्रिज भूषण शरण सिंह यांच्यावर येथील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात भारतीय दंडसंहितेचे कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), कलम ३५४ ए (लैंगिक छळ), ३५४ डी (पाठलाग करणे) आणि कलम ३४ (समान हेतू) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सिंह यांच्यावर लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याखालीही गुन्हा दाखल झालेला आहे.

ब्रिज भूषण शरण सिंह यांचा मेळावा लांबणीवर

लखनौ, २ जून/प्रतिनिधीः भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांचा अयोध्येत पाच जून रोजी आयोजित केलेला जन चेतना मेळावा लांबणीवर टाकण्यात आला आहे. सिंह यांच्यावरील लैंगिक आरोपांची पोलिस चौकशी करीत असल्यामुळे मेळावा लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अयोध्येतील प्रशासनाकडून ब्रिज भूषण शरण सिंह यांनी मेळाव्यासाठी परवानगी घेतली नव्हती, असे सूत्रांनी म्हटले. अयोध्येत आधीच कलम १४४ लागू करण्यात आले असल्यामुळे मेळाव्याला परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाला.

सिंह यांना त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षातून हाकलून लावण्याचा दबाब भाजपवर वाढत असताना आपले संख्येबळ दाखवण्यासाठी पाच जूनचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

… अन्यथा आंदोलन करणार 

image.png

कुरुक्षेत्र : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग याच्याविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पूर्ण पाठींबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी कुरुक्षेत्र येथे शेतकऱ्यांनी महापंचायत बोलावली होती. सरकारने या कुस्तीपटूंच्या तक्रारी सोडवून खासदार ब्रिजभूषण शरण सिंगला ९ जून पर्यंत अटक करावी. अटक नाही केली तर खाप पंचायत कुस्तीपटूंसह दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा खाप पंचायतच्या नेत्यांनी केला आहे.
खेळाडूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणीही महापंचायतने केली आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवला गेला पाहिजे. आता ११ जूनरोजी शामली येथे महापंचायत होणार आहे. सरकारला संधी दिली जाईल. असे शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकेत यांनी सांगितले. महिला कुस्तीपटूंच्या नातेवाईकांना धमकावले जात आहे. सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे टिकेत यांचे म्हणणे आहे.
खाप महापंचायत सदस्यांनी ब्रिजभूषण शरण सिंग याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे राकेश टिकेत यांनी सांगितले. आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. असेही टिकेत यांनी स्पष्ट केले.