छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा हा प्रवास स्वराज्य,सुशासन आणि आत्मनिर्भरतेचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

·         “राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेची मूलभूत तत्वे होती “

 ·         “शिवाजी महाराजांनी नेहमीच भारताची एकता आणि अखंडता कायम राखण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले” 

·         “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेतून दिसते. 

·         “शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवून राष्ट्र निर्माणासाठी लोकांना प्रेरित केले” 

·         “छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दूरदृष्टीमुळे इतिहासातील इतर वीरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत” 

·         “भारतीय नौदलाच्या ध्वजावरील ब्रिटिश राजवटीची ओळख हटवून त्याजागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा स्थापित करण्यात आली आहे” 

·         “छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचारधारा आणि न्यायप्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे”

नवी दिल्ली,​२​ जून / प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्याला  संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक दिन प्रत्येकासाठी नवी चेतना आणि नवी ऊर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक काळातील एक विशेष अध्याय आहे आणि त्यातील स्वराज्य, सुशासन आणि समृद्धीच्या महान गाथा आजही आपणा सर्वांना प्रेरणा देतात असे ते म्हणाले.

“राष्ट्राचे कल्याण आणि लोककल्याण ही शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेची  मूलभूत तत्वे होती ” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात वर्षभर असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आणि या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले.

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यात स्वराज्य आणि राष्ट्रवादाची भावना समाहित होती असे पंतप्रधानांनी नमूद केले. शिवाजी महाराजांनी नेहमीच भारताची एकता आणि अखंडता कायम राखण्याला  अनन्यसाधारण महत्त्व दिले असे ते म्हणाले.  आज एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते, असे पंतप्रधान म्हणाले.

.image.png

आपल्या देशवासीयांमधला आत्मविश्वास जागृत ठेवण्याची जबाबदारी नेत्यांची असते हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देशात किती  आत्मविश्वास होता याची कल्पना केली जाऊ शकते असे सांगितले.  शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे नागरिकांचा आत्मविश्वास खचला होता , आक्रमणकर्त्यांनी केलेले  आक्रमण आणि शोषण तसेच  गरिबीमुळे समाज कमकुवत झाला होता. “आपल्या सांस्कृतिक केंद्रांवर हल्ला करून लोकांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा  प्रयत्न झाला” असे पंतप्रधानांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ आक्रमणकर्त्यांशीच लढा दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वासही त्यांनी जनतेमध्ये निर्माण केला, असे पंतप्रधान म्हणाले. . “शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवून लोकांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित केले”, असे  मोदी म्हणाले.

इतिहासात असे अनेक राज्यकर्ते झाले आहेत,  जे आपल्या सैन्याच्या सामर्थ्यासाठी ओळखले जातात परंतु त्यांची प्रशासकीय क्षमता कमकुवत होती आणि त्याचप्रमाणे असेही अनेक राज्यकर्ते होऊन गेले जे त्यांच्या उत्कृष्ट कारभारासाठी प्रसिद्ध होते, परंतु त्यांचे सेना नेतृत्व कमकुवत होते याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अद्भुत होतं. त्यांनी ‘स्वराज्या’ ची  स्थापना केली आणि ‘सुराज्य’ ही साकार केले असे पंतप्रधान म्हणाले. शिवाजी महाराजांनी लहान वयातच किल्ले जिंकून आणि शत्रूंचा पराभव करून आपल्या सैन्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली तर दुसरीकडे राजे या नात्याने सार्वजनिक प्रशासनात सुधारणा राबवून  सुशासनाचा मार्गही दाखवला असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, एकीकडे त्यांनी आक्रमणकर्त्यांपासून आपल्या राज्याचे आणि संस्कृतीचे रक्षण केले, तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन समोर ठेवला. “छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या दूरदृष्टीमुळे इतिहासातील इतर नायकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत”, असे असे सांगत पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाच्या व्यक्तीमतत्वावर  प्रकाश टाकला ज्यामुळे लोकांना स्वाभिमानाने जगण्याची शाश्वती मिळाली होती. त्याचबरोबर, पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संस्कृती आणि वारसा यांना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर संदेश दिला ज्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्यात स्वावलंबनाची भावना जागृत झाली. या सर्व कारणांची परिणीती जनतेमध्ये राष्ट्राप्रती आदर वाढण्यात झाली असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. शेतकरी कल्याण असो, महिला सबलीकरण असो, किंवा सामान्य माणसासाठी प्रशासन सुलभ बनवणे असो, असे सांगत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन प्रणाली आणि त्यांची धोरणे आजही तितकीच सुसंगत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आज आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारताची सागरी क्षमता ओळखून, नौदलाचा विस्तार आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याची माहिती त्यांनी दिली. जोरदार लाटा आणि भरती-ओहोटीचा तडाखा सहन करून शिवाजी महाराजांनी  बांधलेले किल्ले आजही समुद्राच्या मध्यात अभिमानाने उभे आहेत असा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. शिवाजी महाराजांच्या राज्य विस्तारा बाबत सांगताना पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांनी समुद्रकिनाऱ्यापासून ते पर्वतापर्यंत किल्ले बांधले याचा उल्लेख केला. त्या काळातील जल व्यवस्थापनाशी संबंधित त्यांच्या व्यवस्थेने तज्ञांना आश्चर्यचकित केले असे पंतप्रधानांनी नमूद केले. शिवाजी महाराजांकडून मिळालेली प्रेरणा घेऊनच, गेल्या वर्षी भारताने नौदलाला गुलामगिरीतून मुक्त केले कारण ब्रिटीश राजवटीची ओळख असलेला भारतीय नौदलाचा ध्वज शिवाजी महाराजांच्या प्रतीकाने बदलण्यात आला आहे असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. “आता, हा ध्वज समुद्र आणि आकाशात नवीन भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे”, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचारधारा आणि न्यायाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, धोरणात्मक कौशल्ये आणि शांततापूर्ण राजकीय व्यवस्था आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरोवउद्गार पंतप्रधानांनी काढले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांवर जगातील अनेक देशांमध्ये चर्चा होत असल्याबद्दल तसेच त्याच्यावर संशोधन होत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. मॉरिशसमध्ये महिनाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. “आझादी च्या अमृत काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे हा एक प्रेरणादायी प्रसंग आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी प्रस्थापित केलेली मूल्ये आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहेत”, या मूल्यांच्या आधारे अमृत काळाचा २५ वर्षांचा प्रवास पूर्ण झाला पाहिजे यावर त्यांनी विशेष भर दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा हा प्रवास स्वराज्य, सुशासन आणि स्वावलंबनाचा असेल. हा विकसित भारताचा प्रवास असेल”, असे नमूद करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.