कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? शिवकुमार की सिद्धरामय्या?

बंगळुरू, १३ मे/प्रतिनिधीः काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निरंकुश बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावर पक्षात चर्चा जोरदार सुरू आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे आघाडीवर आहेत. 

सिद्धरामय्या यांना पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “त्याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी निवडून आलेल्या आमदारांशी चर्चा करून घेतील. पक्षश्रेष्ठींकडून येथून निरीक्षक पाठवले जातील आणि सल्लामसलत व चर्चा करून योग्य प्रक्रियेनंतर निर्णय घेतला जाईल.”

डी. के. शिवकुमार यांनीही पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे म्हटले.

पक्षश्रेष्ठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासाठी ५०-५० अशा सूत्रासह विचार करीत आहेत कारण लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात त्याचे फार महत्व आहे, असे सूत्रांनी म्हटले. सिद्धरामय्या यांना अहिंदा (अल्पसंख्याक, हिंदूलिदा आणि दलित) नेता समजले जाते. पक्षाच्या जाहीरनाम्यातील आश्वासने आणि धोरण ठरवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोचरी टीका करण्यासाठी सिद्धरामय्या ओळखले जातात.

राज्यात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना व विद्यमान मंत्र्यांना भाजपने २०१९ मध्ये आपल्या गळाला लावल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी पक्षाची उभारणी खूप कष्टांनी केली. शिवकुमार यांनी पक्षाला संघटित आणि संसाधनांनी युक्त केले. ते वोक्कलिगा समाजाचे असून काँग्रेस पक्षासाठी त्यांनी आपल्या समाजाची बहुसंख्य मते मिळवण्यात यश मिळवले आहे.