कर्नाटक भाजपच्या हातून निसटले; काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

बंगळुरू ,१३ मे  / प्रतिनिधी :- ​कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल समोर आले आहेत. निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप पक्षाचा धुव्वा उडाला असून, राज्यात काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालाकडे फक्त एका राज्याचा निकाल म्हणून आता बघितले जाणार नसून या कर्नाटक निवडणुकीत भाजपने आणि पंतप्रधान मोदींनी पूर्ण ताकद लावली होती.

काँग्रेस आणि भाजपसाठी कर्नाटकची निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येणार? यावरून निवडणूक चर्चेत होती. या पराभवाने भाजपच्या मिशन दक्षिणला जोरदार झटका बसला आहे. दक्षिणेत भाजपची फक्त कर्नाटकमध्येच सत्ता होती. या पराभवामुळे ते राज्यही भाजपच्या हातून निसटले आहे. या वर्षी तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण कर्नाटमधील पराभवाने भाजपला मोठा झटका बसला आहे.

शेवटच्या टप्प्यातील प्रचार हा बंजरंगबली भोवती फिरला होता. काँग्रेसनं बजरंग दलावर बंदीचं आपल्या घोषणापत्रात जाहीर केल्यामुळे हा वाद पेटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटकच्या जनेतनं बहुमताचा कौल काँग्रेसच्या बाजूनं दिला. त्यामुळे बजरंगबलीचा मुद्दा भाजपला तारू शकला नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बजरंगबलीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना बजरंगबलीचं नाव घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून प्रचारादरम्यान बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजपनं मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा मुद्दा पुढे केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता.

खरं तर काँग्रेसनं घोषणापत्र जाहीर केल्यानंतर प्रचारात बजरंगबलीची एन्ट्री झाली. बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन काँग्रेसनं आपल्या निवडणूक घोषणापत्रात दिलं आहे. काँग्रेसचं घोषणापत्र जाहीर होताचं भाजपनं त्यावरून काँग्रसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचा बजरंगबलीला विरोध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. ऐन निवडणूक प्रचारात भाजप आणि बजरंग दलानं ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठनचं आयोजन करुन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजरंगबलीच्या मुद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी आपल्या प्रत्येक सभेची सुरुवात ‘बजरंग बली’च्या जयघोषाणं केली. भाजपच्या या खेळीमुळे प्रचारात काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. काँग्रेस नेत्यांकडून त्यावर वारंवार स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. निवडणूक प्रचारात भाजपच्या हाती आयताच बजरंगबलीचा मुद्दा मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस बजरंग दलावर बंदीच्या मुद्यावरून सेल्फ गोल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

देशात अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. पण दक्षिणेत मात्र भाजपचा हा विजय रथ येऊन थांबतो. कर्नाटक असे राज्य होते जे जिंकून भाजप अधिक शक्तीने तेलंगण निवडणुकीच्या मैदानात उतरली असती. तेलंगणमध्ये यावेळी सामना केसीआर यांच्या बीआरएसशी आहे. पण कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाल्याने भाजपच्या पुढील वाटचालीला मोठा झटका बसला आहे. या वर्षी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेसला भाजवर निशाणा साधल्याची संधी मिळाली आहे.

काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. तर डी. के शिवकुमार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास बजरंगबलीच्या नावाने योजना सुरू करण्याचं आश्वास दिलं होतं. तसेच राज्यभरात हनुमानाची मंदिरं उभारण्याची घोषणाही त्यांनी केली होती. कर्नाटक प्रचारात भाजपनं बजरंगबलीच्या मुद्यावरून वातावरण निर्मिती केली. पण निवडणुकीचा निकाल पाहात बजरंगबली काँग्रेसला पावल्याचं चित्र आहे.

काँग्रेस नेते के रहमान यांनी लगावला भाजपला टोला

के रहमान म्हणाले, कर्नाटक हे उत्तर भारत नाही. येथे तुम्ही जातीय कार्ड खेळू शकत नाही. निवडणूक प्रचारात बजरंगबलींचा मुद्दा उपस्थित करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना कोणी महत्त्व दिले नाही.

निकालाचे विश्लेषण करू अन् लोकसभेत कमबॅक करू – बोम्मई

“कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकत्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू”, असा विश्वास कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.