अखेर डॉ. राजीव डोंगरे यांचा भाजपात प्रवेश, वैजापूर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार

वैजापूर ,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गेल्या काही वर्षांपासून वैजापूर तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असलेले गंगथडी भागातील तरुण नेतृत्व व प्रसिद्ध ह्रदयविकार तज्ञ डॉ. राजीव डोंगरे यांनी अखेर भाजपात प्रवेश घेतला.दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. डॉ.डोंगरे यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे.

या भागातील प्रसिद्ध ह्रदयविकारतज्ञ व जलसिंचनाच्या प्रश्नांवर काम करणारे डॉ.राजीव डोंगरे हे गेल्या काही वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून, गेल्या नगरपालिका निवडणुकीच्यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांची सपत्नीक भेट घेऊन आपल्या पत्नीसाठी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती व प्रचारही सुरू केला होता.मात्र त्यानंतर काय झालं माहीत नाही त्यांनी नगरपालिका निवडणुकीतून माघार घेऊन भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला रामराम ठोकून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून डॉ.राजीव डोंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा सुरू होती.परंतु डॉ.डोंगरे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याची भूमिका घेतली व दिल्ली येथे भाजपचे नेते ,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव,, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे,  कैलास पवार,मोहनआहेर,ज्ञानेश्वर जगताप,सुनील पैठणपगारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.