नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती

पहिल्या टप्प्यात 30 हजार, तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल.”

विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात नेमका आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. आरक्षणानुसार ही पद भरती होणार असल्याने संच मान्यता झाली पाहिजे, असं ते म्हणाले. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल. शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

तसंच विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवू असं दीपक केसरकर यांनी स्षष्ट केलं. यासाठी कुठलीही ऑर्डर पैसे ट्रान्सफर केले नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसंच स्काऊट गाईड, एनएसएस कंपल्सरी करण्यात येणार आहे. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही, असा हेतू त्यामागे आहे. बूट सुद्धा विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतील.