सामनातील अग्रलेखाला आमच्या लेखी महत्त्व नाही:शरद पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्याचा सल्ला

सातारा : ‘सामना’ वृत्तपत्रात काल छापून आलेल्या बहुचर्चित अग्रलेखाला शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘सामनातील अग्रलेखाला आमच्या लेखी महत्त्व नाही’, असे खडेबोल त्यांनी यावेळी संजय राऊतांना सुनावले.

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली होती.

यावर बोलताना अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच १९९९ मध्ये मत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, देशमुख, अशा अनेक जणांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. या सर्वांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली होती, असे पवारांनी स्पष्ट केले.

“राष्ट्रवादीत काय होतं हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही काय केलंय हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की, आम्ही पक्षाचे सर्व सहकारी वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतो, वेगवेगळी मतंही असतात, पण बाहेर जाऊन त्याची कधीच प्रसिद्धी करत नाही. त्यामुळे आम्ही नेतृत्व तयार करतो किंवा करत नाही, हे कुणी लिहिलं त्याचं आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. ते लिहितील, त्यांना लिहायचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. उद्या नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते याची खात्री आमच्या पक्षाच्या सर्व सहकार्‍यांना आहे. आम्हाला माहित आहे आम्ही काय करतो आणि त्यात आम्हाला समाधान आहे”, असं म्हणत राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्याचा सल्ला पवारांनी राऊतांना दिला.

खरंतर शरद पवारांचा हा पलटवार म्हणजे, राऊतांसह सामना वृत्तपत्राला चोख प्रत्युत्तर आहे. आतापर्यंत सत्ताधारी सामनावर निशाणावर साधत होते, पण आता शरद पवारांनी सामनाचा अनुल्लेख केल्यानं, ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. पण, विनायक राऊतांनी मात्र सामनाच्या अग्रलेखांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरवात होते, असं म्हणत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे.खरंतर राऊतांच्या सततच्या टीकेनं महाविकास आघाडीत सध्या संतापाची लाट आहे. काँग्रेस नेतृत्वावरील राऊतांच्या टिपण्णीनंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले, तर राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींवरील सामानातील लिखाण आणि भाष्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत, त्यामुळे आता पवारांच्या पलटवारांनंतर राऊतांविरोधात सुरु झालेली मोहीम शमते की तीव्र होते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.