महाराष्ट्र दिन समारंभ लातूर जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात

जिल्ह्याच्या आरोग्यवर्धिनी उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या हस्ते गौरव ;

जिल्ह्याच्या यशाचा आलेख आणखी वाढवू या – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

लातूर ,​१ मे ​/ प्रतिनिधी :-आयुष्यमान भारत अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी या जिल्ह्याच्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यामुळे इथून पुढे जिल्ह्याच्या यशाचा आलेख आणखी अधिक वाढविण्याची आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा व वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा विषय हाती घेऊन सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेऊन ती पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वदंनानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छापर संदेश दिला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे,स्वातंत्र्य सैनिक, माध्यमकर्मी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

लातूर जिल्ह्यात आयुष्मान भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ४६ आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १८७ उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबर २३३ केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण विभागात जवळपास ४४ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले. उपकेंद्रांवरील बाह्यरुग्ण तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये उपकेंद्रांवरील बाह्यरुग्ण विभागात केवळ दीड लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. तर २०२१-२२ मध्ये जवळपास साडेनऊ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात २७ हजार ४७५ विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये योगा, मॅरेथॉन, सायकलिंग, वॉकिंग, झुम्बा यासारख्या आरोग्य विषयक जागृती करणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता. जिल्ह्यात ‘ई-संजीवनी’च्या माध्यमातून ३ लाख १९ हजार २८७ नागरिकांना टेली-कन्सलटेशन सुविधा देण्यात आली. आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या या सर्व आरोग्य सुविधांची दखल केंद्र सरकारने घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी उपक्रमाला यावर्षीचा प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आला.हे जिल्ह्यासाठी मोठे भूषण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

शासनाकडून शेतकऱ्यांना मदत

अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भुमिका घेतली आहे. मार्च, 2023 मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 22 हजार 565 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने 10 कोटी 56 लाख 55 हजार निधी मंजूर करण्यात आला. गरीब शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्रित माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केले आहे. या अंतर्गत जवळपास १ लाख १५ हजार शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये त्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती घेतली जात आहे. लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होईल.या माहितीचा आधार त्यांच्या पुढील आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आपल्या संदेशात म्हणाले.

जिल्ह्यातील शेत रस्ते अतिक्रमण मुक्त

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या 4 हजार 980 शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत 30 एप्रिलपर्यंत त्यापैकी 4 हजार 585 रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या 1 हजार 93 शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. 30 एप्रिलपर्यंत यापैकी 971 शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लातूर जिल्हा कचरामुक्त नियोजन

लातूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेच्या धर्तीवर कचरामुक्त शहरांची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत तयार करणे, सुका कचरा विविध घटकात वेगवेगळा संकलित करून त्याच्या विक्रीतून उत्पन्न निर्माण केले जात आहे. याला आता मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात डंपिंग ग्राऊंड निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवत असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या या संदेशात केला.

जिल्ह्यातील युवक – युवतींसाठी कौशल्य विकास

कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 5 मे ते 6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर मेळावे घेतले जाणार आहेत. यामध्ये दहावी आणि बारावीनंतरचे शिक्षण व अभ्यासक्रम, करिअर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआय पास झालेल्या 1 लाख विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत प्रतिमहिना 5 हजार रुपये प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिली.

अमृत काळातील राज्याच्या पहिल्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्यात महिला बचतगटांच्या माध्यमातून ‘बांबू क्लस्टर’ विकसित करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे. सोबतच कृषि, वीज, सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्यविषयक तरतुदींमुळे जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला लाभ होणार आहे. राज्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य दिले जात होते. या लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी दरवर्षीप्रतिव्यक्ती 1800 रुपये रोख रक्कम त्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा केली जाणार असून लातूर जिल्ह्यातही जवळपास 53 हजार 180 शेतकरी कुटुंबातील जवळपास 2 लाख 48 हजार सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी राज्य सरकारची 6 हजार रुपयांची वाढीव मदत देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून प्रतिवर्षी, प्रतिशेतकरी 6 हजार रुपये जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 2 हजार 686 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत होते. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता ही रक्कम दुप्पट होणार असून आता प्रतिवर्षी, प्रतिशेतकरी 12 हजार रुपये रक्कम वितरीत केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वयोवृद्ध नागरिकांना आधार

वयोवृद्ध निराधारांच्या उदरनिर्वाहाला आधार म्हणून संजय गांधी निराधार योजना/श्रावणबाळ योजनेतून जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 58 हजार 407 निराधारांना दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. यामध्ये वाढ करून दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना घोषित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. राज्यात 17 मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 26 एप्रिलपर्यंत लातूर जिल्ह्यातील 17 लाख 84 हजार 501 इतक्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी विकास आराखडा

शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत राज्य शासनाने 2023-24 पासून जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लातूर जिल्हा विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे साध्य ठरविण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात संभाव्य उष्ण लाट

येणारे कांही दिवस तीव्र उष्णतेचे असल्यामुळे दुपारी 12-00 ते 4-00 या काळात अपरिहार्य करणांशिवाय घराच्या बाहेर पडू नका. या काळात अंग मेहनतीची कामे टाळा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी शेवटी केले आणि महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबिय, पत्रकार, अधिकारी यांना भेटून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वंदन व संचालनानंतर आयोजित विशेष समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विविध विभागात अनुकंपाखाली घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस नवी दिल्ली या संस्थेचा यंग रिसर्चर अवॉर्ड -23, द इको इनोवेशन अवॉर्ड, लाईफ टाईम ॲच्युमेंट अवॉर्ड पर्यावरण व जलसंरक्षण या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास कोकरे यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

वेंगुर्ला नगर परिषद जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी राबविलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दखल घेवून या प्रकल्पाचा समावेश सीबीएससीच्या इय्यता सहावीच्या विज्ञान तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावी पर्यावरण शिक्षणा व जलसुरक्षा पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकासात लातूर जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट काम करण्यात येत आह. त्यात डी.बी.गिरी यांचे विशेष योगदान आहे.

उपविभागीय कार्यालय, लातूर अतंर्गत हणमंतवाडी ता. लातूर येथील पोलीस पाटील भाऊसाहेब सपाटे यांचा प्रशस्तीपत्र सत्कार करण्यात आला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील ॲड. सुजाता माने (केंद्रे) यांना महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2017-2018 चा पुरस्कार शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह आणि पुरस्काराचा धनादेश प्रदान करण्यात आला.

1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यकमातंर्गत लातूर जिल्ह्यासाठी 16 हजार 957 मोतिबिंदु शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्टे देण्यात आले होते. परतु, लातूर जिल्ह्याने 23 हजार 506 मोतीबिंदु शस्त्रक्रिया करुन 138.92 टक्के काम पूर्ण केले आहे. राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय, लातूर समान्य रुग्णालय अहमदपूर या संस्थांनी सहभाग नोंदवला, तसेच अशासकीय स्वंयसेवी रुग्णलये व खाजगी रुग्णालये यांनीसुध्दा हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. तसेच डॉ. एस.जी. पाठक व त्यांच्या चमुने 4 हजार 41 मोतीबिंदु शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे डॉ. श्रीधर पाठक यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवजेस्वीनी कार्यक्रमांतर्गत सन 2022-2023 या वर्षाच्या नियोजनाप्रमाणे “ जेडर सेन्सीटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांच्या सक्षमीकरण विकासाकरिता पुढाकार घेत असलेल्या तसेच समाजात स्त्रीयांना समानतेने वागविणाने व महिलांना माणूस म्हणून अधिकारी जपणाऱ्या “ सुधारक” सन्मानाकरिता निवड करुन उत्कृष्ट तीन पुरुषांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. यात नागोराव पवार, संग्राम काचे, श्री. पाटोळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरीक्षक शेख अय्युब गफुरसाब, महेश पारडे (पोहेकॉ 130), खर्रम इक्तेसाद काझी (पोहेकॉ 546), सदानंद योगी (पोहेकॉ 824), अनंत शिंदे (पोहेकॉ 285) आणि परमेश्वर ढेकणे (पोना 1331) प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून, सेवेत दाखल झाल्यापासून आज पावेतो सेवेत सातत्य दाखवून उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह (डी.जी. इनसीगनीया) 3211 पदक प्राप्त झाले आहे. तसेच सलमान अब्दुल खदीर नबीजी (पोकॉ/ 988) यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात विशेष प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह (डी.जी. इनसीगनीया) पदक प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले.

शहरातील गरोदर मातांना प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करणे व प्रसती पश्चात घरी सोडणे यासाठी असलेला जननीरथ हा उपक्रम उत्कृष्टरित्या राबविल्याबद्दल महानगरपालिकेतील निवासी वैद्यकीय अधिकारी (मानधन) डॉ. महेश पाटील यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.