खारघर मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई,२५  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे अनेक जणांचा मृत्यू झालेला. या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका होत आहे. याच प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका  करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारचे  टेन्शन वाढणार का? हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या 14 श्रीसदस्यांच्या मृत्यूचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात  पोहचला आहे. याप्रकरणी अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी हायकोर्टात (High Court) दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुरस्कारप्राप्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकेच  जबाबदार धरत त्यांच्यावरही फौजदारी कारवाईची विनंती  या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. विरार येथील सामाजिक कार्यकर्ता शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात केलेली  असून लवकरच यावर सुनावणी होणे अपेक्षित आहे.

या घटनेनंतर राज्य सरकारनं संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र,  या दुर्घटनेस जबाबदार कोण? असा सवाल विरोधीपक्षाकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी अंदाजे १४ कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात ही जनहित याचिका करण्यात आली  असून दोषींवर कारवाई करा या मागणीसह जनतेचा हा पैसा आयोजकांकडून वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.