रिफायनरीवरून वादंग

उद्धव ठाकरेंचे बिंग फुटले!मंत्री उदय सामंत यांनी पत्रासह उघड केला दुटप्पीपणा

ही ग्रीन रिफायनरी आहे, बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही!-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले

राजापूर/ रत्नागिरी/ मुंबई  ,२५  एप्रिल / प्रतिनिधी :- कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी सुमारे ११० आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून, पोलिसांची दडपशाही थांबवून काम स्थगित करण्याची मागणी करीत विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले.

बारसू परिसरात प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक प्राथमिक कामाला गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवर जोरदार विरोध सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ग्रामस्थांनी सर्वेक्षणाचे काम तीव्र विरोध करून बंद पाडले. या आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामालाही विरोध होणार, याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या रविवारपासून बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू केली. मात्र, ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर बारसूच्या सडय़ावर ठिय्या मांडला. सोमवारी काही नागरिकांना घरी पाठवण्यात आले. मात्र, आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला. प्रशासनानेही सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा या परिसरात तैनात केला. सोमवारी कोणतीही कारवाई झाली नाही. मंगळवारी सकाळपासून मात्र येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस बंदोबस्तात काही खासगी गाडय़ा येत असल्याचे दिसल्यावर महिलांनी बारसू सडा येथील रस्त्यावर लोळण घेत गाडय़ा रोखल्या. यावेळी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत ११० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि आधीच तेथे आणून ठेवलेल्या एसटी गाडय़ांमध्ये बसवून रत्नागिरीत आणले. तसेच घटनास्थळी वार्ताकन करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनाही तेथून हुसकावून लावले.

मंत्री उदय सामंत यांनी पत्रासह उघड केला दुटप्पीपणा

नाशिक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचे पत्र देखील सामंत यांनी यावेळी दाखवले.

आज मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले की, नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. काल देखील याबाबत बैठक झाली. ज्याला मला भेटायचे आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असे जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळले की आंदोलन होत नाही, म्हणून हे सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे.

रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनीच सुचवले होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. १२ जानेवारी २०२२ रोजीचे हे पत्र आहे. बारसूमध्ये १३ हजार एकर जमीन राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. राज्य सरकारच्या या पत्रानंतरच केंद्र सरकारने बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सोशल माध्यमांवर देखिल व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बारसू विरोधात बोलणाऱ्या ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे.

ते म्हणाले की, बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असे म्हटले जात आहे.” ते पुढे म्हणाले की, “सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. फक्त एका व्यक्तीबाबत हा प्रश्न आला आहे, ते उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने झाले असावे, असे सामंत म्हणाले.

मुख्यमंत्री नाराज नाहीत

दरम्यान, सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण मुख्यमंत्री पदावरुन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सुट्टीवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री नाराज असे कोण म्हणतो? गावच्या जत्रेत जात असतील आणि नाराजीची चर्चा असेल तर जे चर्चा करत आहेत. त्यांचा जत्रेतच नागरी सत्कार करावा लागेल, असेही उदय सामंत यांनी इशारा देत म्हटले आहे. तसेच याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाणार, हे मुख्यमंत्री दीड वर्ष कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत

हे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने आपले बिंग फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत झाल्याची माहिती समोरी आली आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी विनायक राऊत आणि संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी कोकण भाग असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यामध्ये उडी घेतली असून याबाबत उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ही ग्रीन रिफायनरी आहे, बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही!

विजयापुरा : आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्‍यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठणकावून सांगितले. आता या विरोधाची सुपारी कुणाकडून? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या तीन कंपन्या एकत्र येऊन ही रिफायनरी करीत आहेत. प्रारंभीपासून त्यांनी रिफायनरीला विरोध केला. मग सत्तेत आले आणि ही रिफायनरी बारसूला करायचे, हे त्यांनीच ठरविले, तसे पत्र पंतप्रधानांना पाठविले. आता काम सुरु झाले, तर पुन्हा विरोध.

विरोधकांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी चर्चा करायला आणि त्यांचे गैरसमज दूर करायला आम्ही तयार आहोत. पण, राजकारणासाठी जे विरोध करीत आहेत, त्यांना आम्ही सहन करणार नाही. अशीच रिफायनरी जामनगरमध्ये आहे, तेथील आंबे निर्यात होतात. त्यामुळे कोणतेही नुकसान रिफायनरीमुळे होत नाही, हे सिद्ध झाले आहे.

ही ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. पण, खोटे बोलून विरोधक आणखी किती मोठे नुकसान महाराष्ट्राचे करणार आहेत? एक झाड सुद्धा त्या जागेवर नाही. कातळशिल्पाची जागा सोडून देऊ, हेही आम्ही सांगितले. काही विरोध करणारे राजकारणासाठी तर काही बाहेरच्यांना सोबत घेऊन विरोध करणारे आहेत. मग आम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन विरोध करता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.