वैजापूर बाजार समिती निवडणूक ; १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात

शिंदे – भाजप गट व महाविकास आघाडी समोरासमोर  ; निवडणूक लक्षवेधी ठरणार 

वैजापूर ,​२०​ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी 28 एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (२०​ एप्रिल  ) २३२ उमेदवारी  अर्जांपैकी तब्बल १७६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक रिंगणात अठरा जागांसाठी ४१ उमेदवार राहीले आहेत. यात शिवसेना शिंदे गट – भाजप युतीच्या बळीराजा सहकारी विकास पॅनल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रत्येकी अठरा उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनलमध्ये समोरासमोर लढत होणार आहे. शिंदे- भाजप गट व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्राप्त २३२ उमेदवारांपैकी तब्बल १७६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवसाअखेर माघारी घेतले. त्यामुळे निवडणुक रिंगणात 56 उमेदवार असल्याचे दिसून आले. यात 14 उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने प्रत्यक्षात निवडणुक रिंगणात केवळ ४१ उमेदवार शिल्लक आहेत. 

या निवडणुकीतून भाजपाचे एकनाथ जाधव, नबी पटेल, चांगदेव उघडे, अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे विशाल शेळके, प्रहारचे रामचंद्र पिल्दे, मनसेचे दिलीप आवारे आदी उमेदवारांनी माघार घेतली. राष्ट्रवादीचे विशाल शेळके यांच्या उमेदवारीवरुन पक्षांतर्गत गोंधळ बघायला मिळाला. तथापि उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी पक्षाशी एकनिष्ठ राहुन काम करु असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी सांगितले. तर बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील, संजय पाटील निकम व भागीनाथ मगर या तिघांनी पुन्हा निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे.

बळीराजा सहकारी विकास पॅनल

सहकार संस्था मतदार संघ : कल्याण दांगोडे, धनंजय धोर्डे, काकासाहेब पाटील, भागिनाथ मगर,रामहरी जाधव, कल्याण जगताप, शिवाजी गोरे, शिवकन्या पवार, अलकाबाई वैद्य, अरुण पवार, रजनीकांत नजन

ग्रामपंचायत मतदार संघ: गणेश इंगळे, प्रवीण पवार, गोरख आहेर, प्रशांत त्रिभुवन

व्यापारी मतदार संघ : सुरेश तांबे, पारस बोहरा

हमाल तोलारी मतदार संघ : बद्रिनाथ गायकवाड

शेतकरी विकास पॅनल

सहकारी संस्था मतदार संघ : संजय निकम, अविनाश गलांडे, रिखब पाटणी, ज्ञानेश्वर जगताप, कचरु डिके, बाळासाहेब भोसले, जगन्नाथ जाधव, अनिता वाणी, द्वारका पवार, प्रशांत सदाफळ, काशिनाथ भालेकर

ग्रामपंचायत मतदारसंघ : उत्तम निकम, अशोक चव्हाण, अमृत शिंदे, यशवंत पडवळ

व्यापारी मतदारसंघ : विजय ठोंबरे, शेख रियाज शेख अकील

 हमाल तोलारी मतदारसंघ : रविंद्र पगारे.