सोन्‍या-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्कम लंपास करणारा चोरट्यास सक्तमजुरी 

छत्रपती संभाजीनगर,१६ एप्रिल / प्रतिनिधी :-  घराचे कुलूप तोडून घरातील सोन्‍या-चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्कम लंपास करणारा चोरटा अमोल वैजीनाथ गलाटे (२८, रा. छत्रपती नगर, बीड बायपास) याला एक वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमाखांली तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एल. रामटेके यांनी ठोठावली.

या प्रकरणात किरण हरी परदेशी (३७, रा. शिवाजीनगर अकरावी योजना) यांनी फिर्याद दिली होती. रक्षाबंधनाच्‍या सणानिमीत्त ११ ऑगस्‍ट रोजी फिर्यादी हे आई व पत्‍नीला घेवून सासुरवाडीला गेले होते. संधी साधत चोरट्याने त्‍याच्‍या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले २४ हजार ५०० रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्‍याची रिंग, ४ हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे नेकलेस, साडेतीन हजार रुपयांचे कानातील रिंग, दोन हजार रुपये किंमतीची चांदी आणि साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. १२ ऑगस्‍ट रोजी फिर्यादी हे घरी परतले असता घरी चोरी झाल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी अमोल गलाटे याला बेड्या ठोकल्या. त्‍याच्‍याकडून विविध पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत चोरी केलेला ऐवज जप्‍त करण्‍यात आला. २८ ऑगस्‍ट २०२२ रोजी पासून आरोपी हा जेल मध्‍ये आहे.

या गुन्‍ह्यात तत्कालीन उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी संतोष राऊत यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्‍यायालयाने आरोपीला भादंवी कलम ४५४, ४५७ आणि ३८० अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपयप्रमाणे एकूण तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन सुभाष भुरके यांनी काम पाहिले.