कालीमाता चोरी प्रकरण:सव्वा महिना उलटूनही चोरटे मोकाट; परिसरातील महिला आक्रमक

पो​लिस उपअधीक्षक आणि निरीक्षक यांच्या दारात मदतीसाठी फोडला टाहो

छत्रपती संभाजीनगर,१५ एप्रिल / प्रतिनिधी :-  कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र कालीमठ येथे प्रसिध्द कालीमाता मंदिरात चोरी होऊन सव्वा महिना उलटला.कालीमाता चोरी प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि विश्वस्त कुंभकर्ण झोपेत आहे. सव्वा महिना उलटूनही चोरटे मोकाट, परिसरातील महिला आक्रमक झाल्या.कन्नड येथे संतप्त महिलांनी पो​लिस उपअधीक्षक आघाव आणि पो​लि​स निरीक्षक भालेराव यांच्या दारात मदतीसाठी टाहो फोडला.

भर उन्हात उपाशीपोटी महिलांनी लेकरंबाळासह पो​लि​स ठाणे गाठले. न्याय द्या अन्यथा आम्ही टोकाचे पाऊल उचलू, असा इशारा दिला.कालीमातेच्या दागिन्यांसह मूर्तीची विटंबना केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र अद्यापही कुणावर कारवाई झाली नाही. मातेची विटंबना होऊनही कारवाई होत नसल्याने हिंदू धर्मीय नाराज आहेत.जिल्हा प्रशासन आणि  पो​लि​स कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी संतप्त भाविक आणि कालीमठ संघर्ष समितीतर्फे अध्यक्ष व विश्वस्तांचा पुतळ्याचे दहन केले होते. परिसरातील भाविकांच्या भावनाचा आता बांध फुटला आहे. काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आता प्रशासन जबाबदार राहील. याप्रकरणी ताबडतोब दखल घ्यावी, अशी मागणी भाविकांनी केली.

संशयित चोराचे फुटेज समोर,कारवाई करा

चोरी प्रकरणात संशयित चोर परिसरातील असल्याचा संशय आहे. याबाबत दबक्या आवाजात चर्चा असून, यापूर्वी असेच त्यांनी केले आहे. त्यामुळे चुका झाकण्यासाठी नवीन चोरी त्याने केल्याचं आता समोर आले.