स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, यासंदर्भातील सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होणं अशक्य असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. मागील आठ महिन्यांपासून या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झालेली नाही. आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करण्यात आला होता. हे प्रकरण आजच्या कामकाजात ३९ नंबरवर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आज न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या प्रकरणातील मुद्दे निश्चित करण्यासाठी सॅालिसिटर जनरल यांच्याबरोबर याचिकाकर्त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.