देशभरात सरासरीच्या ९४ टक्केच पाऊस पडणार:महाराष्ट्रात ‘या’ महिन्यात कमी पाऊस

मुंबई : अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच मुंबईकरांसह ठाणेकरांना चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला असून यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेचा यंदाचा मान्सूनबद्दलच्या अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस ८५८.६ मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. तर देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याआधीही एल निनोचा परिणाम मान्सूनवर होण्याचे भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेने केले होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवणार आहे. त्यावेळी एल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल.