केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभ

जालना,२६ मार्च  / प्रतिनिधी :- शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 45 हजार 662 कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून जालना येथे आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे व सहकार, इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री तथा जालना जिल्ह‌्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांच्या उपस्थितीत आज ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ झाला.

जालना शहरातील कन्हैय्यानगर येथील रास्त भाव दुकानाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, तहसीलदार छाया पवार, भास्कर दानवे, शहरातील रास्त भाव दुकानदार व लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.

शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरणास आज प्रारंभ झाला.

यावेळी केंद्रीय रावसाहेब पाटील म्हणाले की, गोरगरीबांना  सणउत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी  शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरु केला आहे. गुढी पाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत  जिल्हयातील  3 लाख 45 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. गरीबाची चिंता करणारे हे शासन असून लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की,  सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मागील दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला. त्याच पध्दतीने गुढी पाडवा व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या जिल्हयातील  शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. याचा लाभ शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा.

कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.  शिधामध्ये रवा,साखर, चनाडाळ व खाद्यतेलाचा समावेश आहे.

जालना तालुक्यातील 68 हजार 55, बदनापूर तालुक्यातील 31 हजार 425, भोकरदन तालुक्यातील 59 हजार 604, जाफ्राबाद तालुक्यातील 34 हजार 505, परतूर तालुक्यातील 31 हजार 494, मंठा तालुक्यातील 30 हजार 844, अंबड तालुक्यातील 48 हजार 605, घनसावंगी तालुक्यातील 41 हजार 130 शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधाचे वितरण होणार आहे.