माविमच्या महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उदघाटन

महिला बचत गट आर्थिक उन्नतीची मोठी चळवळ; बँकांची परत फेड करण्यात महिला अग्रेसर – जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

️माविमचे जिल्ह्यात 4,500 महिला बचत गट

️बचत गटात एकूण 48 हजार महिला सहभागी ️या महिलांची 32 कोटी 66 लाखाची बचत

️या प्रदर्शन व विक्री महोत्सवात 75 महिला बचत गटाचे स्टॉल

लातूर ,२४ मार्च  / प्रतिनिधी :-  लातूर जिल्ह्यात महिला बचत गटाची मोठी चळवळ आहे, यातून हजारो महिलांनी आपले कुटुंबं आर्थिकदृष्ट्या स्वालंबी केले असून कर्ज परतावा खात्रीशीर आहे. त्यामुळे बँकापुढे येऊन कर्ज देतात. जिल्ह्यातील महिला बचत गटानी आता उद्योजक म्हणून पुढे यावं त्यांना पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ मिळू शकतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

     कल्पतरु मंगल कार्यालय, दत्त मंदिर, औसा रोड, लातूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील महिला बचत गटाकडून उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री नवतेजस्वीनी महोत्सव 2023 चे 24 ते 26 मार्च पर्यंत आयोजित समारंभाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आर. एस. चोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या श्रीमती कल्पना क्षिरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्व्यक एम. एस. पटेल यांच्यासह माविमचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

           महिला या पुरुषांपेक्षा अधिक काटकसर करतात त्यामुळे त्यांनी कामावलेले पैसे हे कुटुंबाच्या आर्थिक विकासात भर घालणारे ठरतात. महिला बचत गटाची चळवळ सुरु झाल्या पासून महिला बचत गट अत्यंत हिमत्तीने व्यवसाय करत आहेत त्यातून मोठे उत्पन्न मिळत आहे. बँकाही आता पाच-  पाच, दहा – दहा लाख रुपये या महिलांना देत आहे. हे सर्व खूप महत्वाचे  आणि अभिमानास्पद असल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी बोलून दाखविली.

लातूरच्या “ज्वारीच्या म्हैसूर पाकचा”  मुंबईत बोलबाला

  मुंबईत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील महिलांच्या बचत गटाकडून निर्मिती केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे ‘सरस ‘ प्रदर्शन नुकतेच आयोजित केले होते. त्यात लातूर माविमच्या रामकृष्ण स्वयंसहायता महिला बचत गटाने ज्वारीच्या म्हैसूरी पाक, दाळीचे सांडगे, खारुड्याचा स्टॉल लावला होता. त्यात त्यांच्या ज्वारीच्या म्हैसूरी पाकला मोठी मागणी होती. हे वर्षे जागतिक तृण धान्य वर्ष असल्यामुळे या ज्वारीच्या म्हैसूरी पाकाचे अभिनव गोयल यांनी कौतुक केले आणि स्वादही घेतला, ही मिठाई आरोग्याला चांगली असून अत्यंत स्वादिष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संपूर्ण स्टॉलला भेटी देऊन महिला बचत गटाचा उत्साह द्विगुणित केला.

           लातूर जिल्ह्यातील बचत गट अत्यंत चांगले काम करत आहे. यातील बहुतांश महिला कृषी व्यवसायाशी निगडित असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला कृषी विभागाच्या विविध योजनांची जोड दिली तर ही चळवळ अधिक गतीने पुढे जाईल. लातूर जिल्ह्यात त्यादृष्टीने काम करण्याचा मनोदय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी बोलून दाखविला. महिला बचत गटाची चळवळ नाबार्डने 1992 सुरु केल्याचे सांगून   आज देशभरात 1 कोटी 39 लाख महिला बचत गट काम करत असून 14 कोटी कुटुंब यामुळे एकमेकांना जोडले गेले. यातून प्रचंड मोठी बचतीची चळवळ देशभर रुजली असल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी यावेळी दिली.

लातूर जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 4500 हजार महिला गट चालविले जात असून 48 हजार महिला या बचत गटातून काम करतात. या बचत गटाच्या माध्यमातून 32 कोटी 66 लाख एवढी बचत झाली असून महिला बचत गटाकडून विविध बँकाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची टक्केवारी 95 टक्के आहे. जिल्ह्यातील तीन महिला बचत गटाच्या व्यवसायाचे रूपांतर आता लघु उदयोगात झाले आहे. अशी माहिती माविमचे जिल्हा समन्व्यक एम. एस. पटेल यांनी आपल्या प्रस्ताविकात दिली.

यावेळी बचत गटाला विविध बँकांचे कर्जाचे धनादेश देण्यात आली. अनेक यशस्वी बचत गटाच्या महिलांचा सन्मान करण्यात आला.