छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा

छत्रपती संभाजीनगर,१९ मार्च  / प्रतिनिधी :-  आज सकल हिंदू समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनात जनगर्जना मोर्चा काढला. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण, तरीदेखील या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा मोर्चा शांततेच्या मार्गानेच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी मोर्चामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध कर्णयांविरोधात घोषणाबाजी केली.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरून आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यामध्ये आज भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली.

या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, “खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा.” दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.

या वेळी प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी आमदार राजासिंह ठाकूर, पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यासह आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मोर्चावेळी काही टवाळखोरांनी दगडफेक, तोडफोड केली. त्याप्रकरणी चार पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

महात्मा फुले चौकात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा येथील भाजप आ. राजासिंह ठाकूर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुनील चव्हाणके, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, विनोद पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, संजयअप्पा गारजे आदींची भाषणे झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नाकारणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा नाही, असे मत आ. राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले. शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते, असा दाखला दिला जातो. तेव्हा छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध का, असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला. जंजाळ आणि पोलिसांत बाचाबाची : मोर्चातील काही पदाधिकाऱ्यांनी पोस्टर आणि बॅनर फाडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले होते. त्यांना ठाण्यात नेण्यासाठी पोलिस ठाम होते. तेव्हा जंजाळ यांनी पदाधिकाऱ्यांना साेडून देण्याची विनंती केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन इंगोले यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. काही वेळाने त्यांना साेडून दिले. दरम्यान, मोर्चात २६ अधिकाऱ्यांसह ४०० पोलिस कर्मचारी तैनात होते. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता स्वत: मोर्चादरम्यान शेवटपर्यंत उपस्थित होते.

झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तोडफोड उस्मानपुरा पोलिस ठाण्यात रोनक आशिष मालू (१८), दीपक नकुल कुमावत (२१, दाेघे रा. छत्रपतीनगर), नकुल नरहरी चौधरी (१८, रा. परभणी), जनक वैभव मालू (सातारा) यांच्यावर झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले.

चुन्नीलाल पंपासमोर बसवर केली दगडफेक चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर बसवर दगडफेक केल्याप्रकरणी विशाल कृष्णा लांडे (२२, रा. गंगापूर), सिद्धार्थ किशोर काळे (२३, रा. गंगापूर) यांच्यासह अन्य दहा जणांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. क्रांती चौक पोलिस ठाण्यातच मोर्चासंबंधी अन्य तीन गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवाई इमारतीवरून घरांवर दगडांचा मारा महात्मा फुले चौकात एका चहा स्टाॅलवर काही मोर्चेकरी चढले. एकाने वर उभ्या व्यक्तीला दगड मारला. वरील एकाने खाली जमावावर विटांचा ढीग फेकला. त्यामुळे तरुणांनी खालून दगडांचा मारा सुरू केला. पोलिसांनी त्यांना रोखले तेव्हा नाल्यावरील शिवाई इमारतीवरून घरांवर दगडांचा मारा सुरू झाल्याने गाेंधळ उडाला.

निराला बाजारात गोंधळ } तरुणांनी डान्स अकॅडमीवर भिरकावले दगड १० ते १५ तरुणांनी निराला बाजार येथील ॲक्सिस बँकेच्या विरुध्द दिशेला असलेल्या स्टेप ऑफ डान्स अकॅडमीवर दगड भिरकावले. याप्रकरणी दुर्गेश सचिन चव्हाण (रा. कांचनवाडी), विकी गोरखनाथ हेगडे (रा. बजाजनगर), सुनील सुभाष बोराडे (रा. मंठा), विशाल कृष्णा लांडे (रा. गंगापूर) सिद्धार्थ किशोर काळे (दोघेही रा. गंगापूर) व अन्य पंधरा जणांवर गुन्हे दाखल केल्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.