काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या घरी पोहचले दिल्ली पोलीस

नवी दिल्ली,१९ मार्च / प्रतिनिधी:- आज सकाळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या विधानाबाबत दिल्ली पोलिसांनी त्यांना यापूर्वी नोटीस पाठवली होती. राहुल गांधींना पोलिसांनी नोटीस पाठवून ‘लैंगिक छळ’ पीडितेची माहिती मागवली होती. यासंदर्भात आज दिल्ली पोलिसांचे पथक राहुल गांधींच्या घराबाहेर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.

एका पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केले होते. या प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्यांना या पीडितेची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण, त्यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा हे यावर म्हणाले की, “आम्ही राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी आलो असून त्यांनी ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये एक विधान केले होते. ‘भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सागितले.’ राहुल गांधींकडून याचीच माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे,” अशी माहिती दिली.