हा एकनाथ शिंदे गद्दार नाही, वफादार, खुद्दार आहे; मुख्यमंत्री शिंदेंची गोळीबार मैदानात एल्गार

रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या सभेत केली विरोधकांवर टीका

खेड,१९ मार्च  /प्रतिनिधी :-आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला, तर लाव रे तो व्हिडोओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथी शिंदे म्हणाले की, “एकनाथ शिंदे हा वफादार आहे. हा गद्दार नाही, तर खुद्दार आहे. माझ्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी शिंदे, महादजी शिंदेंनी बलिदान दिले, ते कधीच मागे नाही हटले. हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही आणि पुढे होणार नाही,”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “तुम्ही खोके-खोके, गद्दार म्हणून स्वतःची किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते, हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचे दैवत होते. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.” अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली. पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ” स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी वारंवार केला आणि करत आहेत. पण त्यावर तुम्ही मूक गिळून गप्पा का? तुमच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ येते. तुम्हाला माहिती आहे, ज्या मणिशंकर अय्यरने सावरकरांबाबत विधान केले होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला चपलेने झोडले होते. पण राहुल गांधींच्या विधानावर तुम्ही काहीच का बोलत नाहीत? हे कसले तुमचे हिंदुत्व? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, हेही एक कारण आहे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पाडण्याचे.” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, “सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही केली नाही, ती २०१९ला तुम्ही केली. हिंदुत्वाचे राजकारण केले, ही चूक झाली असे विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितले. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचे ठरवलेत का? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचे ठरवलेत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचे दुर्दैव काय असू शकते?” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले

खेडमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम यांच्या जामगे गावी उपस्थित राहून देवी कोटेश्वरी मानाईचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

खेड येथील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संबोधित करताना खोके आणि गद्दारी करून नव्हे तर खुद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला शिवसेनेचा #धनुष्यबाण सोडवून आणल्याचे ठणकावून सांगितले.

सगळीकडे तीच टेप आणि फक्त दोन मुद्यांवर टीका हेच रडगाणं आता राज्यभर ऐकायला मिळणार असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. माझा बाप चोरला असं सगळीकडे सांगत सुटता, मात्र आम्ही वंदनीय #हिंदुहृदयसम्राट#शिवसेनाप्रमुख#बाळासाहेब_ठाकरे यांच्या संपत्तीचा नव्हे तर विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहोत त्यामुळे त्यांचे विचार हेच आमची संपत्ती असून ती आमच्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे असे यावेळी बोलताना अधोरेखित केले.

२०१९ साली आपण केलीत ती खरी गद्दारी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा दिवा आपल्या डोक्यात पेटवल्याने सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिलीत. दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातलंत, हिंदुत्वाचा विचार सोडून दिलात, सावरकरांवर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलंत, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ कचरायला लागली त्यामुळेच हिंदुत्ववादी विचार जागे ठेवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली असे याप्रसंगी स्पष्ट केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायचे, मात्र आपण कार्यकर्ता मोठा होतोय हे पाहून आनंदित झाला नाहीत. ज्या पक्षाचा कार्यकर्ता मोठा तो पक्ष मोठा, ज्या पक्षाचा कार्यकर्ता लहान तो पक्ष लहान ही साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही. त्यामुळेच आधी नारायण राणे मग राज ठाकरे आणि आता रामदास कदम यांना राजकारणातून संपवायला निघालात हे पक्षाचे मोठे दुर्दैव असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. अशीच भूमिका राहिली तर सगळे कार्यकर्ते निघून जातील फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच तुमच्याकडे राहतील, असेही यावेळी बजावून सांगितले.

आमदार योगेश कदम हा खेडवासीयांसाठी प्रामाणिकपणे काम करत असून त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, त्यामुळे कितीही आले तरीही त्याला कुणीही पराभूत करू शकणार नाही असे यावेळी निक्षून सांगितले.

कोकणात सभा आहे म्हणून फक्त आगपाखड करायला आलो नाही असे सांगत कोकणवासीयांसाठी काही घोषणा केल्या. कोकणचे पाणी अडवून कोयनेत सोडण्याच्या खेड कोयना प्रकल्पासाठी २४३ कोटी रुपये मंजूर केल्याचे याप्रसंगी सांगितले. तसेच कोकणातील लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यासमयी दिली. खेड नळपाणी योजना ४५ कोटी, क्रीडा संकुल २० कोटी, मरीन पार्क अशा अनेक विकासकामांना मंजुरी दिली जाईल असे यावेळी बोलताना नमूद केले. कोकणात येणाऱ्या वादळांमुळे नादुरुस्त होणाऱ्या विजेचे खांब दुरुस्त करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केल्याचे याप्रसंगी जाहीर केले. डिसेंबरपर्यंत #मुंबई#गोवा महामार्ग पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यासमयी दिले. तसेच कोकणात समृद्धी महामार्गाप्रमाणे ग्रिनफिल्ड महामार्ग तर किनारी भागांना जोडणारा कोस्टल महामार्ग तयार करण्यात असल्याचे देखील जाहीर केले. कोकणातील आंबा आणि काजू पिकांवर प्रकिया करणारा उद्योग सुरू करण्यावर नक्की भर देण्यात येईल तसेच मंडणगड येथे नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत नक्की सकारात्मक विचार करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम, ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरतशेठ गोगावले, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेना राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना उपनेत्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना महिला संघटक सौ.मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, शिवसेनेचे कोकणातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाखो शिवसैनिक व कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.