जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

– शेतकऱ्यांना दिला धीर
– तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

जालना,१९ मार्च  / प्रतिनिधी :-अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही पिकांची पाहणी केली.

जालना तालुक्यातील कडवंची, धारकल्याण, नाव्हा, बोरखेडी या गाव परिसरातील द्राक्ष, गहू, ज्वारी या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसिलदार छाया पवार, भास्कर दानवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, तालुका कृषी अधिकारी, तलाठी व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मागील दोन दिवसांपासून जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सदर भागाचा दौरा केला.