प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’च्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन जखमी

मुंबई,६ मार्च  /प्रतिनिधी :-प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या हैद्राबादमध्ये सुरु झाले होते. या चित्रीकरणादरम्यान बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगवर ही माहिती दिली आहे. तसेच, ते सध्या त्यांच्या जलसा बंगल्यामध्ये विश्रांती घेणार असून चाहत्यांना भेटता येणार नाही असे सांगितले आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग वरून माहिती दिली की, ‘दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.’ असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवरून माहिती दिली की, “श्वास घेताना आणि हालचाल करताना त्रास होत आहे. वेदना कमी करण्यासाठी मी औषधे घेत आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण सध्या रद्द करावे लागले. मी काही दिवस मोबाईलवर उपलब्ध असेल परंतु घरीच आराम करणार आहे.”