शिवसेना शिंदेंची आणि धनुष्यबाणही शिंदेंचाच! निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या हातातून शिवसेना निसटली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे. तर या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत  संजय राऊत यांनी दिले आहेत.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.

हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय – शिंदे

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असून अखेर सत्याचा विजय झाला. हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे. हा तमाम शिवसैनिकांचा विजय आहे. जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.