काँग्रेस आमदार अस्लम शेख ईडीच्या जाळ्यात अडकणार?

मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मागवला अहवाल

मुंबई : कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवल्याने माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अस्लम शेख यांनी मढ मार्वेत एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यात अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप आहे.

याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगल आणि भाटी गावातल्या ४९ स्टुडिओंसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल आता ईडीने मागवला आहे. मनी लाँड्रींग आणि फेमा कायद्यानुसार, हा अहवाल तपासणार असल्याचे ईडीने म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी केले आहेत गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर तब्बल ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे हे लुटारु सरकार होते. गेल्या दोन वर्षात माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम केले आहे. यातील ५ स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये आहेत. मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे १० लाख स्केअर फूटची जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.