स्वच्छ, सुंदर, सबल राष्ट्र घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचे युवा वर्गाला आवाहन

भारताचे खरोखरच  एक लघुरूप  दर्शवणारा राष्ट्रीय युवा महोत्सव एकता आणि अखंडतेचे प्रतीक  : अनुराग ठाकूर

धारवाड ,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-  कर्नाटकातील धारवाड येथे आयोजित 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संबोधित केले. या पाच दिवसीय महोत्सवाचे  उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी तरुणांना ,वाय -20 टॉक्स  आणि  वाय -20 वॉक्स  मध्ये सहभागी  होण्यासाठी तसेच  जी -20 समूहातील  नेत्यांना  विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपाय सुचवण्याच्या दृष्टीने  दस्तऐवज  तयार करण्यासाठी आमंत्रित केले.

स्वच्छ, सुंदर, सबल राष्ट्र घडवण्यासाठी तरुण पिढीने सरकारी उपक्रमांमध्ये  सक्रियपणे सहभाग घ्यावा असे  आवाहन त्यांनी यावेळी केले. नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या विविध युवा कल्याणाच्या उपाययोजनांची  रूपरेषा अधोरेखित करत या उपाययोजनांचा  देश उभारणीच्या कार्यात  प्रभावीपणे उपयोग व्हावा, असे आवाहन अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.

हुबळी-धारवाडमध्ये हरित महोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेल्या  राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी दैनंदिन जीवनात वावरताना  कचरा कमी करण्याच्या उपक्रमांची गरज मंत्र्यांनी अधोरेखित केली.  याबाबत प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.