एक मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाही:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिले उत्तर

नागो गाणार यांना उमेदवारी घोषित

मुंबई ,१६ जानेवारी  / प्रतिनिधी :- शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. नाशिकच्या सत्यजित तांबे यांच्या राजकीय भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री यांनी नागो गाणार यांना उमेदवारी घोषित करीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागो गाणार यांना उमेदवारी घोषित केली असून भाजप आणि मित्र परिवाराचे त्यांनी समर्थन राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बारा वर्षे नागो गाणार आमदार राहिले आहेत. पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे सांगत कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर करू शकत नाही या शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला आहे. नागो गाणार हे सातत्याने त्यांचे प्रश्न लावून धरतात, तर काही शिक्षक आमदार हे शिक्षकांचे प्रश्न सोडून बिल्डरांचे प्रश्न लावून धरतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर गाणार हे फक्त शिक्षकांचे प्रश्न मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, अडीच वर्षे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने शिक्षकांसाठी एकही निर्णय घेतला नाही.

राज्यामध्ये एकही शिक्षक भरती केली नाही. आमच्या सरकारने सांगितले आहे की, एकही मुलगा असला तरी शाळा बंद होणार नाहीत, असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे. भाजपने या योजना बंद केल्या आहेत, असे वातावरण विरोधकांकडून तयार केले जात आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.