अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाले! आज राजभवनावर होणार शपथविधी

मुंबई ,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- युती सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर सतत चर्चा, टीका-टिपण्णी सुरु असतानाच अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.

राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 15-35 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. याचबरोबरच 10 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची उद्याची मोहर्रमची सुटी रद्द करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गट

1) गुलाबराव पाटील 2) उदय सामंत 3) संजय शिरसाट 4) दादा भुसे 5) संदीपान भुमरे

भाजपचे संभाव्य मंत्री

1) चंद्रकांत पाटील 2) सुधीर मुनगंटीवार 3) राधाकृष्ण विखे – पाटील 4) गिरीश महाजन

उद्या चित्र स्पष्ट होईल – मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र उद्या स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नांदेडमध्ये आले असता बोलत होते. शिंदे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांचे आज नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही ठोस उत्तर दिले नाही. मात्र, मंत्रिमंडळात नक्की कोणती नावे असतील..? कुणाला संधी मिळेल..? याबाबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.