25 हजार कोटींचा आरोप खोटा, कारखान्यांबाबत चुकीची माहिती – अजित पवार

केस दाखल करण्याचे अजितदादांचे आव्हान

पुणे,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जरंडेश्वर साखर कारखान्याचा उल्लेख करुन काही लोक वारंवार खोटेनाटे आरोप करत आहेत. या सर्व आरोपांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुराव्यासहीत उत्तर दिले. अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन मागील काही वर्षांमध्ये झालेल्या साखर कारखान्यांच्या विक्रीच्या व्यवहारांची यादी सादर केली. काही लोक माझ्यावर २५ हजार कोटींचा, १० हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र या कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी एसीबी, इओडब्ल्यू, सहकार विभागाने मागे केली असून त्यात काहीही निष्पन्न झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील ६४ सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेले आहेत वा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिले आहेत वा भाडेतत्वावर चालवले जात असल्याचे सांगून अजितदादा पवार यांनी कारखान्यांची यादी वाचून दाखवली. काही लोक खोटेनाटे वक्तव्य करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे अजितदादा म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत सतत माझ्या कुटुंबांचा उल्लेख केला जातो. मात्र जरंडेश्वर साखर कारखान्याने जिल्हा बँकेचे थकलेले पैसै न भरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला. यात कारखान्याला न्यायालयाने दोनदा संधी दिले होती. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटले आहे.

Image

ज्यांच्यामुळे साखर कारखान्याचे नुकसान झाले तेच लोकांसमोर चुकीच्या गोष्टी मांडत असल्याची टीका अजितदादांनी केली. कारखाना कोणी विकत घेतला याची सर्व माहिती, संचालकांची नावे आजकाल इंटरनेटवर पाहायला मिळतात. ज्यांना रिकामा वेळ आहे त्यांनी जाऊन तपासावे, असा टोलाही अजितदादांनी लगावला. तसेच जे सतत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर आरोप करत आहेत, मी बेइमानी केली असे बोलत आहेत, त्यांनी केस दाखल करावी, असे आव्हान अजितदादांनी यावेळी दिले.

3 कोटीलाही कारखान्याची विक्री

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला. 2013 लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना 69 कोटी 75 लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली. सर्वाधिक किंमती विकल्या गेलेला हा कारखाना आहे. तर, 2013मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना 11 कोटी 97 लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. हा कारखाना सर्वात कमी किंमतीत विकला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

कोणता कारखाना कितीला विकला

>> 2007मध्ये नागपूरचा राम गडकरी सहकारी साखर कारखाना विकला गेला. 12 कोटी 95 लाखाला विकला. नगरच्या प्रसाद शुगर्स कंपनीला विकला गेला.

>> 2008 मध्ये अमरावतीचा श्री अंबादेवी सहकार कारखाना 15 कोटी 25 लाखला विकला गेला. मुंबईतील कायनेटिक पेट्रोलियम कंपनीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009मध्ये वर्ध्याचा महात्मा सहकारी साखर कारखाना 14 कोटी 10 लाखाला विकला गेला. नागपूरच्या महात्मा शुगर्स अँड पॉवर्स या कंपनीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009 मध्ये भंडाऱ्याचा वैनगंगा सहाकरी कारखाना 14 कोटी 10 लाखाला विकला गेला. वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेडने हा कारखाना खरेदी केला.

>> 2009मध्ये यवतमाळच्या शंकर साखर कारखाना 19 कोटी 25 लाखाला विकला गेला. जालन्याच्या सागर वाईन्सने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी डेक्कन शुगरला विकला.

>> 2009मध्ये अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना 17 कोटी 10 लाखाला विकला गेला. मुंबईच्या व्यंकटेश्वर अॅग्रो शुगर प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>>  2009मध्ये अमरावतीचा कोंडेश्वर कारखाना 14 कोटी 72 लाखाला विकला गेला. जयसिंगपूरच्या सुदीन कन्स्लटन्सी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2009मध्ये नांदेडचा शंकर साखर कारखाना 14 कोटीला 75 लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.

>> 2010मध्ये साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना 66 कोटी 75 लाख विकला गेला. हा कारखाना मुंबईच्या गुरु कमोडिटीने विकत घेतला.

>> 2010मध्ये परभणीचा नरसरी साखर कारखाना 40 कोटी 25 लाखाला विकला गेला. मुंबईच्या त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2011मध्ये लातूरचा बालाघाट सहकारी साखर कारखाना 31 कोटी 36 लाखाला विकला गेला. लातूरच्याच सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.

>> 2011 मध्ये नांदूरबारचा पुष्पदंतेश्वर साखर कारखाना 45 कोटी 48 लाखाला विकला गेला. मुंबईच्या अॅस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला. नंतर त्यांनी आयान एलएलपी शुगर लिमिटेडला हा कारखाना विकला.

>> 2012 मध्ये सांगली जिल्ह्यातील जतमधील राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी कारखाना 47 कोटी 86 लाखाला विकला गेला. सांगलीच्याच राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये जालन्यातील सहकारी साखर कारखाना 42 कोटी 31 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या तापडीया कन्ट्रक्शनने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये नांदेडमधील हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना 45 कोटी 51 लाखाला विकला गेला. नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना विकत घेतला. नंतर सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडला त्याची विक्री करण्यात आली.

>> 2012मध्ये नांदेडचा जय अंबिका सहकारी साखर कारखाना 33 कोटी 48 लाखाला विकला गेला. कुंटुर शुगर अॅग्रो लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2012मध्ये औरंगाबादचा कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटी 20 लाखाला विकला गेला. हा कारखाना बारामती अॅग्रो लिमिटेडने विकत घेतला.

>> 2013मध्ये नागपूरचा श्रीराम सहकारी साखर कारखाना 11 कोटी 97 लाखाला विकण्यात आला. कोल्हापूरच्या व्यंकटेश्वरा प्रॉजेक्ट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये औरंगाबादचा घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना 18 कोटी 62 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या घृष्णेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये जालन्याचा बागेश्वरी सहकारी कारखाना 44 कोटी 10 लाखाला विकला गेला. पुण्याच्या श्रद्धा एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013मध्ये जळगावचा संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना 30 कोटी 85 लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या श्रद्धा (मुक्ताई) एजन्सीने हा कारखाना विकत घेतला.

>> 2013 लातूरचा प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना 69 कोटी 75 लाखाला विकला गेला. लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने या कारखान्याची खरेदी केली.

>> 2014मध्ये सांगलीचा निनाईदेवी सहकारी साखर कारखाना 24 कोटी 30 लाखाला विकला गेला. दालमिया शुगर लिमिटेडने हा कारखाना विकत घेतला.

>> 2014 मध्ये नगरचा नगर तालुका सहकारी कारखाना 38 कोटी 25 लाखाला विकला गेला. औरंगाबादच्या पियुष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरने हा कारखाना विकत घेतला.

>> 2015मध्ये बुलढाण्याचा शिवशक्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना 18 कोटी 19 लाखाला विकला गेला. पुण्याच्या बिज सेक्युअर लँप्सने हा कारखाना विकत घेतला.

>> 2015 नगरच्या पारनेर सहकारी लिमिटेड हा कारखाना 31 कोटी 75 लाखाला विकण्यात आला. पुण्याच्या क्रांती शुगरने हा कारखाना विकत घेतला.

>> 2016मध्ये यवतमाळचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना हा 43 कोटी 95 लाखाला विकला गेला. नॅचरल शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीजने हा कारखाना विकत घेतला.

>> 2016मध्ये नांदेडचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना 28 कोटी 4 लाखाला विकला गेला. नांदेडच्या शिवाजी सर्व्हिस स्टेशनने हा कारखाना विकत घेतला.

>> 2017मध्ये सोलापूरच्या संतनाथ सहकारी कारखाना 13 कोटी 23 लाखाला विकला गेला.

>> 2020मध्ये सांगलीतील तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना 37 कोटी 67 लाखाला विकला गेला. सांगलीच्या एसजीझेड अँड एसजीए शुगरने हा कारखाना विकत घेतला.