चित्रा वाघ यांच्या आरोपांवर काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

मुंबई ,६ जानेवारी  / प्रतिनिधी :- येत्या दिवसांमध्ये उर्फी जावेदवरून सुरु झालेला वाद चांगलाच तापणार आहे. कारण, उर्फी जावेदच्या वेषभूषेवरून आता राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ विरुद्ध महिला आयोग असा सामना पाहायला मिळत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, उर्फी जावेदवर टीका करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर ताशेरे ओढले होते. यावरून आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत त्यांनी खोटी माहिती दिली असल्याचा दावा केला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेत म्हणाल्या की, ” चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती पुरवली आहे. अनुराधा बेवसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला कोणतीही नोटीस पाठवली नव्हती. यासंदर्भात आम्ही ‘अनुराधा’ वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. ही नोटीस आम्हाला मिळालेल्या तक्रारीवरून पाठवण्यात आली होती. दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा, असे या नोटीसमध्ये होते. त्यानंतर दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तरही दिले होते. यामध्ये कुठेही अभिनेत्री तेजस्विनी पंडिताचा उल्लेख नव्हता.” असे स्पष्टीकरण दिले आहे. एवढचं नव्हे तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस पाठवले आहे, असेदेखील सांगितले. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही; उर्फी प्रकरणावरुन वाघ संतापल्या

उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. वाघ यांनी थेट महिला आयोगाला लक्ष्य करीत रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. उर्फी जावेद प्रकरणामध्ये महिला आयोगाने सुमोटो केस चालवणे गरजेचे होते. परंतु महिला आयोगाने उर्फीला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. वाघ यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये उर्फीवर हल्लाबोल करत अजुनपर्यत राज्य महिला आयोगाने तिच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी पुन्हा उर्फीवर सडकून टीका केली.

महिला आयोगाला सांगून देखील त्यांच्याकडे कारवाईची मागणी करुनही त्यावर काहीच का केले गेले नाही, याचे उत्तर आम्हाला द्या. मुंबईत महिला उघडीनागडी फिरत असताना या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असताना दुर्लक्ष केले गेले असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला.

त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवरच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर अंगप्रदर्शनाचा आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना आयोगाने नोटीस पाठवल्याचे वाघ यांनी सांगितले.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसे वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

येथे कुणाच्या धर्माचा प्रश्न नाही, तिचा जो नंगानाच सुरु आहे. हे सारे आम्ही महाराष्ट्रात चालु देणार नाही. उर्फी ही महिला मुस्लिम आहे म्हणून हे सारे सुरु आहे असे विरोधी पक्षाचे काम आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगते विषय नंगटपणाचा आहे. महिला आयोगानं तेजस्वी पंडितला देखील नोटीस पाठवली होती. तिच्या अनुराधा वेबसीरिजसाठी तिला नोटीस धाडली होती. त्या मालिकेचे पोस्टर आक्षेपार्ह होते. असे आयोगाचे म्हणणे होते. मात्र उर्फी जे काही करते आहे त्याला विरोध आहे. ते आता थांबले पाहिजे. असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.