अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी

मंदिराच्या ठिकाणी पुन्हा बाबरी मशिद बांधण्याची ‘अल कायदा’ची दर्पोक्ती

नवी दिल्ली,६ जानेवारी  / प्रतिनिधी :-उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरावर अतिरेक्यांची वक्रदृष्टी पडली आहे. अल कायदा या कुख्यात अतिरेकी संघटनेने आपल्या मुखपत्राद्वारे हे मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. अल कायदाने आपल्या ‘गझवा ए हिंद’ नियतकालिकाच्या डिसेंबरच्या आवृत्तीत राम मंदिराच्या जागी भव्य मशिद बांधण्याचा इशारा दिला आहे.

‘गझवा ए हिंद’ नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही गरळ ओकण्यात आली आहे. तसेच भारतीय मुस्लिमांना जिहादचे समर्थन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. नियतकालिकात २००२ च्या गुजरात दंगलीचाही उल्लेख आहे.

‘बाबरी मशिदीच्या पायावर बांधण्यात येणारे राम मंदिर पाडून मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद पुन्हा बांधली जाईल. मुस्लिमांनी आतापर्यंत खूप काही सहन केले आहे. त्यामुळे आता त्यांनी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीला घाबरू नये. प्राण व वित्तहानीचा वापर जिहादसाठी केला असता तर एवढे नुकसान झाले नसते,’ असे अल कायदाने आपल्या ११० पानी गझवा ए हिंदच्या माध्यमातून म्हटले आहे.

या मासिकातील मजकूर भारतीय वातावरणाशी संबंधित असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेला वाटत आहे. त्यामुळे अल कायदाच्या येथील स्लिपर सेलचाही मुद्दा उपस्थित होत आहे.

या मुखपत्रानुसार, मोदी व योगी आदित्यनाथ यांना गझवा ए हिंद व शरिया कायदा उपखंडात पाकचा प्रोपोगेंडा असल्याचे वाटते. धर्मनिरपेक्षता भारतीय मुस्लिमांसाठी नरक आहे. तर हिंदू-मुस्लिम बंधूभाव नारा एक प्रकारची फसवणूक आहे.

३० वर्षांपूर्वी बाबरी मशिद पाडण्यात आली. २० वर्षांपूर्वी गरोदर महिलांचे पोट फाडण्यात आले. त्यांच्या मुलांना ठार मारण्यात आले. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहे. हिंदूंना लाठ्याकाठ्या चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असेही अल कायदाने आपल्या मुखपत्राद्वारे म्हटले आहे.