अपघातात कुत्रा मेल्यास गुन्हा दाखल होत नाही

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारून २० हजारांचा दंडही ठोठावला

मुंबई, ६ जानेवारी/प्रतिनिधीः कुत्रे किंवा मांजरे कोणाला कितीही प्रिय असली तरी मूलभूत विज्ञान या प्राण्यांना मानव समजत नाही. बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवल्यामुळे कुत्रा मरण पावला तर मानवी जीवित धोक्यात घातल्याचा भारतीय दंड संहितेचे कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने कोणती व्यक्ती किंवा मालमत्तेची हानी केल्याशी संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम ४२९ लागू करण्यावरही प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने पोलिसांना खडे बोल ऐकवून दंडही ठोठावला.

न्यायालयाने अभियांत्रिकीचा विद्यार्थी मानस गोडबोले (२०) याच्यावर दाखल झालेला गुन्हाही रद्द केला. तो बाइक चालवताना भटक्या कुत्र्याला धडक लागून त्याचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्याच्या तपासासाठी पोलिसांना फटकारले व राज्य सरकारने विद्यार्थ्याला २० हजार रूपये देण्याचा आदेश दिला.

पोलिसांकडून होणार वसुली

उच्च न्यायालयाने म्हटले की, गुन्हा दाखल करणे आणि आरोपपत्र दाखल करण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून हे पैसे वसूल केले जातील. मानस गोडबोले फूड डिलीवरी बॉयचे अर्धवेळ काम करीत होता. ११ एप्रिल, २०२० रोजी तो बाइक चालवत असताना रस्ता ओलांडत असलेल्या भटक्या कुत्र्याला त्याची धडक बसली होती.

आरोपीकडून कलमांना आव्हान

एका श्वानप्रेमीच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमचे कलम २७९,३३७,४२९,१८४ आणि पशु क्रूरता निवारण अधिनियमांतर्गत गोडबोलेवर गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांनी गोडबोले विरोधात ६४ व्या मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले गेले. गोडबोलेने कलम २७९,३३७ आणि ४२९ ला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

न्यायालय काय म्हणाले

गोडबोले याचे म्हणणे होते की, जे प्रकरण आहे तो गुन्हा बनवला जाऊ शकत नाही. जी वस्तुस्थिती हाती आहे त्या आधारावर वरील कलमे लागू केली जाऊ शकत नाहीत. वरील कलमे मनुष्याला वगळता कोणाला झालेली इजा ओळखत नाही व गुन्हाही होत नाही. पाळीव जनावरांना इजा झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास भारतीय दंड संहितेचे कलम २७९ आणि ३३७ नुसार गुन्हा होणार नाही.