अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीत न्यायालयात हजर

नवी दिल्ली, ६ जानेवारी/प्रतिनिधीः- हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही शुक्रवारी हवाला व्यवहार प्रकरणी येथे पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाली. २०० कोटी रूपयांच्या या व्यवहारात ती एक आरोपी असून त्यात सुकेश चंद्रशेखर व इतरही आरोपी आहेत.

२०० कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणाची फर्नांडिस हिची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. यात सुकेश चंद्रशेखरही गुंतलेला आहे. हवाला व्यवहार प्रकरणात ती याआधीही तपास यंत्रणांपुढे उपस्थित होती.

तत्पूर्वी, याच न्यायालयाने ईडीला आरोपी लीना मारिया पॉल हिच्याकडील २६ कार्स जप्त करण्यास परवानगी दिली होती. लीना पॉल ही सुकेश चंद्रशेखरची पत्नी आहे. २०० कोटी रूपयांच्या हवाला व्यवहार प्रकरणाच्या तपासात ही कारवाई झाली.

पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी लीना मारिया पॉल हिच्या चेन्न्ईतील फार्म हाऊसमधून २६ कार्स जप्त करण्यास ईडीला परवानगी दिली होती. गुन्ह्यांतील कमाईतून या कार्स खरेदी करण्यात आल्याचा ईडीने आरोप केलेला आहे.