फटाक्यांच्या  पांगरी कारखान्यात भीषण स्फोट :९ जणांचा मृत्यू

सोलापूर,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-नववर्षानिमित्त सोलापूरच्या बार्शी गावात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.  या घटनेत स्थानिकांच्या दाव्यानुसार ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की कामगारांचा जागेवरच कोळसा झाला. मदतकार्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मोठा स्फोट झाला, त्यानंतर युनिट आगीत भडकले. यावेळी किमान 40 मजूर फटाके बनवण्यात गुंतले होते.बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ हा फटाक्यांचा कारखाना होता. आज या कारखान्यात फटाके बनवण्याचं काम सुरु असतांना भीषण स्फोट झाला. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात ४० जण काम करीत होते.स्थानिकांनी दावा केला की घटनास्थळावरून किमान 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही.

मदतकार्यामध्ये सहभागी एका गावकऱ्याने सांगितलं की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही मदतीसाठी धावून आलो. ऊसाच्या शेतात दोन महिलांचे मृतदेह उडून पडले होते. काही तडफडत पडले होते. आम्ही पोलिसांना आणि अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला.

ही आग विझविण्यासाठी सोलापूर शहर, उस्मानाबाद, लातूर, कुर्डूवाडी, बार्शी नगरपालिकासह अन्य जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे वाहने घटनास्थळावर दाखल झाली असून आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी सांगितलं की, “स्फोट झालेल्या कारखान्यात 12 जणं होती, असं मला इथं आल्यानंतर माहिती मिळाली. यातील 6 जणांना सुखरूप बाहेर काढलं, तर उर्वरीत 6 पैकी 3 जणाचा आगीत मृत्यू झाला. जखमी असलेल्या तिघांना सोलापूर शहरात रुग्णालयात हलवण्यात आलंय.”

आगीचे लोट परिसरातील 10 किलोमीटर परिसरापर्यंत दिसून येत आहेत.मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलिस प्रयत्न करीत आहेत. या स्फोट आणि आगीमुळे कारखान्याची राखरांगोळी झाली आहे.