कर्करोगाशी दोन हात करताना कर्तव्य बजावणाऱ्या मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे ,२२ डिसेंबर /प्रतिनिधी :- पुण्यातील कसाब विधानसभा आमदार आणि भाजप नेत्या मुक्ता टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचाहर सुरु होते. त्यांच्या मागे त्यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. लोकमान्य टिळक यांच्या पणतू सून असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या लढवैय्या वृत्तीच्या अनेक चर्चा आजही सर्वांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत.

मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास हा नागसेविका म्हणून झाला होता. त्या सलग ४ वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०१७मधील महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला. तब्बल २.५ वर्षे त्यांनी महापौर पॅड सांभाळले. त्यानंतर २०१९मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. आमदार म्हणून निवडणून आल्यानंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरु झाले. तरीही त्यांनी आमदार म्हणून जनतेशी संपर्क ठेवला. एकीकडे कर्करोगाशी झुंज देत असताना दुसरीकडे त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही मुक्ता टिळक यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून प्रवास करून विधानसभेत आपले मत नोंदवले होते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. ‘कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश पाळणे माझी जबाबदारी’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते.