ये एयू एयू कौन है ये एयू एयू?:रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू (AU) नावाने आलेले कॉल नेमके कोणाचे?

नागपूर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काल संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तेव्हापासून दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भाशी निगडीत अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल ‘एयू’ नावाने आले असल्याची माहिती शेवाळेंनी संसदेत बोलताना दिली. ‘एयू’ (एयू) म्हणजे, आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली. तर यावर बोलताना लव्ह यू मोअर म्हणत आदित्य ठाकरेंनी राहुल शेवाळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, राहुल शेवाळेंचे लग्न ठाकरेंनी कसे वाचवले? ते आम्हाला माहिती आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राहुल शेवाळेंना टोलाही लगावला आहे. पण या संपूर्ण आरोप-प्रत्यारोपांमध्ये एयू हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण एयू म्हणजे नेमकं कोण? राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य? तसेच, रियाच्या फोनवर आलेले एयू नावाचे फोन आदित्य ठाकरेंचेच होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चर्कवर्तीच्या फोन रेकॉर्ड्सही तपासले होते. त्यावेळी रियाचे एयू नावाच्या व्यक्तीसोबत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ४४ वेळा संभाषण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी ही व्यक्ती म्हणजे, आदित्य ठाकरे असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, यासोबतच सुशांतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणही पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सची चौकशी केली. त्यातून एयू ही व्यक्ती आदित्य उद्धव ठाकरे नसल्याचे समोर आले होते. तर रियाच्या फोनवर फोन करणारी व्यक्ती रियाची मैत्रीण अनन्या उधास असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र ‘एयू’ (एयू) म्हणजे, आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी लोकसभेत दिल्याने आता हे वादग्रस्त प्रकरण पून्हा एकदा चर्चेत आले आहे.