हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस- अजित पवारांमध्ये खडाजंगी

नागपूर ,२० डिसेंबर/ प्रतिनिधी :- हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. शिंदे फडणवीस सरकारने विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरून विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. यावरुन सभागृहात विरोधकांनी गोंधळ केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली कामे ही महाराष्ट्रातील कामे होती, कर्नाटक आणि गुजरातची कामे नाहीत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. आम्ही अनेक सरकारं बघितली, पण अशी मंजूर झालेली कामे कधी थांबवली नाहीत, अशी टीका अजित पवारांनी केला.

यावरून उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही सातवेळा निवडून आलात. आम्ही खूप कमी वेळा निवडून आलो आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी या तुमच्याकडूनच शिकलो आहोत,” असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी आमच्या सगळ्या कामांना स्थगिती द्यायचे काम तुमच्या सरकारने केले होते. माझ्या स्वतःच्या मतदार संघातली कामे तुम्ही स्थगित दिली होती. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही.”